या महिनाअखेरीस नवी मुंबई विमानतळावरूनही दररोज आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 12:04 IST2026-04-08T12:02:31+5:302026-04-08T12:04:07+5:30
सिडकोचा नवी मुंबईच्या आर्थिक केंद्र सन्मानासाठी ‘रोड मॅप’; १६,२५० कोटींचा अर्थसंकल्प सादर

या महिनाअखेरीस नवी मुंबई विमानतळावरूनही दररोज आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : सिडकोने २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी १६,२५० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करून नवी मुंबईला जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनवण्याचा रोडमॅप मांडला. यात व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी पायाभूत सुविधा, दळणवळण आणि गृहनिर्माण या तीन प्रमुख क्षेत्रांवर विशेष भर दिला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत आर्थिक शिस्त राखून सिडकोने यंदा १६,२५० कोटी उत्पन्न आणि १६,१५० कोटी खर्च अपेक्षित धरला आहे.
नवी मुंबई विमानतळ हा प्रकल्प महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला असून ८ ऑक्टोबर २०२५ रोजी उद्घाटन झाल्यानंतर देशांतर्गत उड्डाणे सुरू झाली आहेत. सध्या दररोज सुमारे १९ हजार प्रवासी या विमानतळाचा वापर करत आहेत. या महिन्याच्या अखेरीस आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होण्याची अपेक्षा आहे. पहिल्या टप्प्यात दरवर्षी २ कोटी प्रवासी आणि ०.५ दशलक्ष टन कार्गो हाताळण्याची क्षमता आहे.
आयकॉनिक प्रकल्पांना गती
- इंडोअर लाइव्ह एंटरटेनमेंट अरेना : २०००० आसन क्षमता
- खारघर गोल्फ कोर्स विस्तार : ९ वरून १८ होल आंतरराष्ट्रीय स्तर
- युनिटी मॉल (पीएम एकता मॉल) : स्थानिक उत्पादने, हस्तकला प्रोत्साहन
एरोसिटी, एड्यू सिटी, थीम सिटी
- एरोसिटी : २७० हेक्टरमध्ये व्यावसायिक, हॉटेल, कन्व्हेन्शन सेंटर
- एड्यू सिटी (करंजाडे) : १०० हेक्टर, जागतिक विद्यापीठांना संधी
- थीम आधारित विकास : विमानतळ परिसरात आर्थिक जिल्हे
मेट्रो, कनेक्टिव्हिटीला मोठा बूस्ट
- मुंबई व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो - ८ : हा प्रस्तावित मार्ग ३४.८९ कि.मी. असून २० स्थानके असणार आहेत. २०३१ पर्यंत दररोज ९.८ लाख प्रवासी वाहतूक अपेक्षित आहे. तसेच बेलापूर–एनएमआयए (लाइन-१) आणि पेंधर–एनएमआयए (लाइन-२) या मेट्रो जोडण्यांमुळे नवी मुंबई मेट्रो नेटवर्क विमानतळाशी जोडले जाणार आहे.
- शिवाय ठाणे ते नवी मुंबई विमानतळ दरम्यान २५.३ कि.मी. लांबीचा सहा पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर उभारला जाणार असून, सुमारे ६५२१ कोटींचा प्रकल्प पीपीपी तत्त्वावर राबवला जाणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ ९० मिनिटांवरून ३० मिनिटांपर्यंत कमी होणार आहे, असे विजय सिंघल यांनी सांगितले.
१९,३०० घरांची नवी योजना
गृहनिर्माण क्षेत्रात सिडकोने २०२५-२६ मध्ये १६,८७६ घरांची योजना राबवली होती. याच धर्तीवर २०२६-२७ मध्ये सुमारे १९,३०० घरांची नवी योजना जाहीर करण्याची तयारी आहे. सिडकोने परवडणाऱ्या गृहनिर्माणासोबतच शहरी विस्तार, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी धोरणात्मक प्रकल्पांवर भर दिला आहे.
पायाभूत सुविधा, दळणवळण आणि दर्जेदार गृहनिर्माणाबाबतच्या वचनबद्धतेला हा अर्थसंकल्प बळकटी देणारा आहे. एअरपोर्ट, मेट्रो, एरोसिटीसारख्या प्रकल्पांमुळे नवी मुंबई प्रमुख आर्थिक व गुंतवणूक केंद्र म्हणून उदयास येईल.
-विजय सिंघल, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सिडको