विदेशी व्यक्तीसोबत ऑनलाईन प्रेमाला भुलली
By सूर्यकांत वाघमारे | Updated: May 12, 2024 17:20 IST2024-05-12T17:19:55+5:302024-05-12T17:20:18+5:30
काहीच दिवसात २७ किलोचे पार्सल भारतात आले असून ते मिळवण्यासाठी महिलेकडे वेगवेगळ्या शुल्कची मागणी करण्यात आली.

विदेशी व्यक्तीसोबत ऑनलाईन प्रेमाला भुलली
नवी मुंबई : सोशल मीडियावर विदेशी व्यक्तीसोबत झालेल्या ओळखीतून त्याला स्वतःचे अश्लील फोटो पाठवणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. या व्यक्तीने महिलेला महागडे गिफ्ट पाठवत असल्याचे सांगून १६ लाख रुपये उकळले आहेत. शिवाय तिचे अश्लील फोटो, व्हिडीओ व्हायरल करण्याचीही धमकी दिली आहे.
कामोठे परिसरात राहणाऱ्या उच्चशिक्षित महिलेसोबत ही घटना घडली आहे. सदर महिलेची सोशल मीडियाद्वारे जाफरी रोनाल्ड नावाच्या व्यक्तीसोबत ओळख झाली होती. यावेळी सदर व्यक्तीने तो पोलंड येथील रहिवाशी असल्याचे सांगितले होते. चॅटिंगद्वारे झालेल्या संभाषणातून त्यांनी एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त केले होते. यातून सदर महिलाही त्याच्या प्रेमात पडली असता त्याच्या मागणीप्रमाणे तिने त्याला स्वतःचे अश्लील फोटो, व्हिडीओ पाठवले होते. यातून त्या व्यक्तीने तिला पोलंड येथून महागड्या भेटवस्तू, आयफोन, दागिने तसेच डॉलर पाठवत असल्याचे सांगितले होते.
काहीच दिवसात २७ किलोचे पार्सल भारतात आले असून ते मिळवण्यासाठी महिलेकडे वेगवेगळ्या शुल्कची मागणी करण्यात आली. त्याच्यावर विश्वास ठेवून महिलेने संबंधितांना ऑनलाईन १६ लाख ५६ हजार रुपये पाठवले. त्यानंतरही पैशाची मागणी होऊ लागली असता आपली फसवणूक होत असल्याचे महिलेच्या लक्षात आले. मात्र महिलेने तक्रार केल्यास तिचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी महिलेने सायबर पोलिसांकडे तक्रार केली असता, गुन्हा दाखल करून कामोठे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.