बंदी झुगारून धबधब्यांवर गर्दी; खारघरमधील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 01:53 IST2020-08-11T01:53:45+5:302020-08-11T01:53:49+5:30
पर्यटकांकडून आदेशाची पायमल्ली

बंदी झुगारून धबधब्यांवर गर्दी; खारघरमधील प्रकार
पनवेल : खारघरमधील पर्यटनस्थळी प्रवेशबंदीचे फलक लावण्यात आले असूनही काही पर्यटक आदेश पायदळी तुडवत आहेत. खारघर टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या धबधब्यावर आनंद घेत पर्यटक गर्दी करत आहेत.
खारघरमधील पांडवकडा धबधबा, सेक्टर पाच खारघर टेकडी, फणसवाडी, चाफेवाडी, ओवे, तळोजा जेलसमोरील तलाव आणि सेक्टर सहा ड्रायव्हिंग रेंजलगत असलेल्या टेकडीवरून पावसाळ्यात कोसळणाऱ्या धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या वर्षी शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पर्यटनस्थळावर बंदी घातली आहे. पावसाळ्यात खारघर परिसरातील धबधबा आणि तलावात आनंद घेताना, पर्यटक पडून जखमी होण्याचे आणि बुडून मृत्यू पावल्याच्या घटना घडल्या असल्यामुळे, खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी पर्यटस्थळ प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून, विनापरवाना प्रवेश केल्याचे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशा प्रकारचे फलक लावले आहेत. असे असूनही काही पर्यटक हेदोरे आदिवासीवाडीलगत डोंगराच्या धबधब्यावर आदेशाचे उल्लंघन करीत गर्दी करत आहेत. यामध्ये तरुणांचे प्रमाणात अधिक आहे.