‘पाणी पाजून’ चड्डी-बनियान टोळी जाळ्यात; पोलिसांकडून कामगिरी फत्ते
By सूर्यकांत वाघमारे | Updated: July 31, 2025 10:06 IST2025-07-31T10:05:42+5:302025-07-31T10:06:40+5:30
मुंबईसह उपनगरांत पावसाळ्यात घडणारे घरफोडीचे गुन्हे रोखण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते.

‘पाणी पाजून’ चड्डी-बनियान टोळी जाळ्यात; पोलिसांकडून कामगिरी फत्ते
सूर्यकांत वाघमारे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : मुंबईसह नवी मुंबई, ठाण्यात घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या चड्डी-बनियान टोळीने पोलिसांच्या नाकात दम आणला होता. मात्र, आता या टोळीच्या मुसक्या आवळून नवी मुंबई पोलिसांनी दोन सख्ख्या भावांना अटक केली आहे. यात पोलिसांनी प्रत्यक्षात त्यांना ‘टँकरचे पाणी पाजून’ ही कामगिरी फत्ते केली आहे.
मुंबईसह उपनगरांत पावसाळ्यात घडणारे घरफोडीचे गुन्हे रोखण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. त्यात चड्डी-बनियान टोळ्यांची दहशत मोडून काढण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनीही कंबर कसली होती. चड्डी अन् बनियान घालून येणारे हे गुन्हेगार येतात कुठून, जातात कुठे? याची कसलीही माहिती पोलिसांना मिळत नव्हती. मात्र, हे आव्हान स्वीकारत पोलिसांनी गुन्हेगारांच्या शोधासाठी कौशल्य पणाला लावले. त्यासाठी गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक तानाजी भगत, हनिफ मुलाणी यांच्या पथकाने संशयिताची माहिती मिळवली.
गुन्ह्यासाठी भाड्याने घर
मुंबईसह उपनगरात गुन्हे करण्यासाठी त्यांनी दिवा येथे भाड्याने घर घेतले होते. अगोदर रेकी केलेल्या ठिकाणी घरफोडी करण्यासाठी जाताना ते थेट न जाता जवळपासच्या दुसऱ्या शहरातून जायचे. यामुळे ते येतात कुठून, जातात कुठे याची माहिती पोलिसांना मिळत नव्हती. मात्र, त्याचा एक भाऊ येरवडा जेलमध्ये असल्याचे पोलिसांना समजले. यावरून त्याच्या कुटुंबीयांची माहिती काढून संशयित गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी दोन्ही पथकांनी शोध सुरू केला.
कामगार बनून घरोघरी वाटले पाणी
संशयित आरोपी दिव्यातील साबे गावातील चाळीत राहत असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. यामुळे नेमके कोणत्या घरात ते राहतात याचा उलगडा करण्यासाठी काही पोलिस अधिकारी, कर्मचारी पाण्याच्या टँकरमधून चाळीत पाणी वाटायला जायचे. ज्या चाळीत गुन्हेगार राहत होते, त्या चाळीला टँकरने पाणीपुरवठा होत होता. त्या टँकरचालकाला विश्वासात घेऊन पोलिस त्याच्यासोबत कामगार बनून घरोघरी पाणी वाटत फिरले. त्यामध्ये एका घरात पारधी समाजाच्या व्यक्ती राहायला असून, तेच गुन्हेगार असावेत यावर पथकाचे एकमत झाले.
यानंतर २५ ते ३० जणांच्या पथकाने चाळीला घेराव घालून संशयित घरातून दोघांच्या मुसक्या आवळल्या. शहाजी पवार, अंकुश पवार अशी त्यांची नावे असून, ते मूळचे धाराशिवमधील कळंबचे राहणारे आहेत. नेरूळ पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल असून चाैकशी सुरू आहे.