सायन-पनवेल टोलवेजवर गुन्हा
By Admin | Updated: July 5, 2017 06:46 IST2017-07-05T06:46:37+5:302017-07-05T06:46:37+5:30
सायन-पनवेल महामार्गावर उरण फाटा येथे मंगळवारी पहाटे चार वाहनांचा अपघात झाला. यामध्ये एक ठार व दोन जखमी झाले.

सायन-पनवेल टोलवेजवर गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावर उरण फाटा येथे मंगळवारी पहाटे चार वाहनांचा अपघात झाला. यामध्ये एक ठार व दोन जखमी झाले. या प्रकरणी वाहनचालकांसह सायन- पनवेल टोलवेज कंपनीविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.
पावसाळा सुरू झाल्यापासून सायन-पनवेल महामार्गावर वारंवार अपघात होऊ लागले आहेत. उरण फाट्याजवळ ५०पेक्षा जास्त अपघात झाले आहेत. सीबीडीमधील चंद्रकांत येशी यांचा अपघातामध्ये मृत्यू झाला होता. वाशी ते कळंबोलीपर्यंत अर्धवट राहिलेली कामे. रोडवरील खड्डे व कामातील त्रुटींमुळे अपघात वाढू लागले आहेत. पोलिसांनी याविषयी वारंवार सायन-पनवेल टोलवेज कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देऊन दुरुस्तीची कामे करण्यास सांगितले होते; परंतु त्यांनी याकडे लक्ष दिले नाही. उरण फाट्याजवळ मंगळवारी पहाटे पुन्हा अपघात झाला. चार वाहने एकमेकांवर धडकली. यामध्ये पीकअप चालक सरफराज सय्यद हा जागीच ठार झाला असून, पंकज ठुकरूल, केसरू घाडगे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी नेरुळ पोलिसांनी वाहनचालकांवर व अपघातास जबाबदार असल्याचा ठपका ठेवून सायन-पनवेल टोलवेज कंपनीविरोधातही गुन्हा दाखल केला आहे. महामार्गाच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल झाल्याने आतातरी दुरुस्तीची कामे केली जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.