coronavirus: नवी मुंबईमध्येही आरोग्य विभागावरील ताण वाढला, ५०१ आरोग्य कर्मचाऱ्यांची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 02:49 AM2021-03-30T02:49:15+5:302021-03-30T02:50:18+5:30

एक महिन्यात नवी मुंबईमधील  सक्रिय रुग्णांच्या संख्येत तब्बल चारपट वाढ झाली आहे. प्रतिदिन ७००पेक्षा जास्त रुग्ण वाढत असून आरोग्य विभागावरील ताण वाढू लागला आहे.

coronavirus: Stress on health department also increased in Navi Mumbai, 501 health workers needed | coronavirus: नवी मुंबईमध्येही आरोग्य विभागावरील ताण वाढला, ५०१ आरोग्य कर्मचाऱ्यांची गरज

coronavirus: नवी मुंबईमध्येही आरोग्य विभागावरील ताण वाढला, ५०१ आरोग्य कर्मचाऱ्यांची गरज

Next

- नामदेव मोरे 
नवी मुंबई : एक महिन्यात नवी मुंबईमधील  सक्रिय रुग्णांच्या संख्येत तब्बल चारपट वाढ झाली आहे. प्रतिदिन ७००पेक्षा जास्त रुग्ण वाढत असून आरोग्य विभागावरील ताण वाढू लागला आहे. प्रमुख रुग्णालयांमध्ये बेड फुल झाले असून मनपाच्या केंद्रांमध्येही जागा अपुरी पडू लागली आहे. यामुळे बंद केलेली सर्व केंद्र पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. डॉक्टर व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांचीही कमतरता असून तातडीने ५०१ कर्मचारी भरती करण्यासाठी कार्यवाही सुरू आहे.  (Stress on health department also increased in Navi Mumbai, 501 health workers needed)
        
नवी मुंबई पालिका कार्यक्षेत्रात एक महिन्यात ८३७४ नवीन रुग्ण वाढले असून रविवारी ७१७ रुग्ण वाढले आहेत. प्रादुर्भाव वाढू लाल्यामुळे आरोग्य विभागावरील ताणही वाढला आहे. बेड कमी पडू लागल्यामुळे यापूर्वी बंद केलेली सर्व कोरोना उपचार केंद्रे पुन्हा सुरू करण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत राधास्वामी सत्संग भवन, एपीएमसीमधील निर्यात भवन, एमजीएम सानपाडा व वाशीतील ईटीसी संस्थेमधील कोरोना उपचार केंद्र सुरू केली आहेत. उर्वरित केंद्रही लवकरच सुरू केली जाणार आहेत. 

नवीन केंद्र सुरू केल्यानंतर तेथे तज्ज्ञ डॉक्टर व इतर मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे आव्हान महानगरपालिकेसमोर उभे राहिले आहे. यापूर्वी तात्पुरत्या स्वरूपात भरती केलेल्या कर्मचाऱ्यांना रुग्ण कमी झाल्यानंतर कामावरून कमी केले होते. आता पुन्हा नवीन कर्मचारी वेळेत उपलब्ध करण्यासाठी महानगरपालिकेची धावपळ सुरू आहे. 

तब्बल ५०१ आरोग्य कर्मचारी भरती करण्यासाठीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. वेळेत नवीन कर्मचारी मिळाले नाहीत तर आहेत त्या कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढणार आहे.  

पालिका प्रशासनाची कसरत
प्रमुख खासगी रुग्णालयांमधील बेड फुल होऊ लागले आहेत. रुग्णवाढ अशीच सुरू राहिली तर सर्वांना योग्य उपचार मिळवून देण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे कर्मचारी वाढवून भार हलका करण्याचा प्रयत्न असणार आहे.  

उपचारांविषयी तक्रारी वाढू लागल्या
कोरोना रुग्णांच्या  उपचारांसह चाचण्यांच्या वैधतेविषयी तक्रारीही वाढू लागल्या आहेत. तुर्भे इंदिरानगरमधील एक व्यक्तीचा एकाच दिवशी एका ठिकाणी पॉझिटिव्ह व एका ठिकाणी निगेटिव्ह रिपोर्ट आला. नेरुळमध्येही एकाचा पहिल्या दिवशी पॉझिटिव्ह व लगेच दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह रिपोर्ट आल्याचे निदर्शनास आले आहे. सानपाडामध्ये क्वारंटाइन सेंटरमधील एका मुलाच्या उपचारांकडे दुर्लक्ष झाल्याचा व्हिडीओही सोमवारी व्हायरल होऊ लागला होता. 

Web Title: coronavirus: Stress on health department also increased in Navi Mumbai, 501 health workers needed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.