CoronaVirus News: नवी मुंबईत पुरुषांनाच कोरोनाचा सर्वाधिक धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 00:08 IST2020-10-07T00:07:57+5:302020-10-07T00:08:09+5:30

कोरोना रुग्णांची संख्या ६१.३८ टक्के; महिलांचे प्रमाण ३८.६१ टक्के

CoronaVirus News: Men are most at risk of corona in Navi Mumbai | CoronaVirus News: नवी मुंबईत पुरुषांनाच कोरोनाचा सर्वाधिक धोका

CoronaVirus News: नवी मुंबईत पुरुषांनाच कोरोनाचा सर्वाधिक धोका

- नामदेव मोरे

नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये पुरुषांनाच कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याचे निदर्शनास आले आहे. एकूण रुग्णांमध्ये ६१.३८ पुरुष व ३८.६१ महिलांचा समावेश आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांमध्येही पुरुषांची संख्या जास्त आहे.

नवी मुंबईमधील कोरोना रुग्णांची संख्या ३८ हजारांपेक्षा जास्त झाली आहे. प्रति दिन ३०० ते ४०० जणांना कोरोनाची लागण होत आहे. नेरुळ, कोपरखैरणे, ऐरोली, बेलापूर परिसरात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. ५ आॅक्टोबरपर्यंत ३८,४६८ जणांना कोरोनाची लागण झाली होती. यामध्ये २३,६१३ पुरुष व १४,८५३ महिलांचा समावेश आहे. पुरुषांची टक्केवारी ६१.३८ व महिलांचे प्रमाण ३८.६१ असल्याचे निदर्शनास आले आहे. पुरुषांचे प्रमाण जास्त असण्यास विविध कारणे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती व एमआयडीसीमध्ये पुरुष कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेर पडल्यामुळे पुरुषांना लवकर लागण होत आहे. याशिवाय नियमांचे उल्लंघन करणाºयांमध्येही त्यांचा समावेश आहे. मास्क न वापरणे, विनाकारण घराबाहेर पडून एकत्र गप्पा मारणे, सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करणे या सर्वांमध्ये त्यांचे प्रमाण जास्त आहे. महानगरपालिका व एपीएमसीसह पोलिसांनीही नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी केलेल्या कारवाईमध्ये पुरुषांचेच प्रमाण जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून शासन व प्रशासनाने केलेल्या आवाहनाप्रमाणे महिलांकडून नियमांचे पालन होत असल्याने त्यांना लागण होण्याचे प्रमाण कमी आहे.

तरुणांकडून उल्लंघन : नवी मुंबईत पुरुषांमध्ये कोरोना होण्याचे प्रमाण जास्त आहे. यामध्येही तरुणांची संख्या जास्त आहे. २० ते ४० वर्षे वयोगटांमधील अनेक तरुण नियमांचे पालन करत नाहीत. मित्र व सहकाºयांसोबत एकत्र गप्पा मारत बसणे. मास्क व सोशल डिस्टन्सिंग नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रमाणही त्यांच्यामध्ये जास्त आहे. तरुणांमध्ये वाढणारा प्रादुर्भाव सर्वाधिक चिंतेची गोष्ट असल्याचे मानले जात आहे.

एपीएमसीमध्ये सर्वाधिक धोका : मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये पुरुष कामगारांची संख्या सर्वाधिक आहे. माथाडी कामगार, वाहतूकदार, व्यापारी, त्यांच्याकडील कर्मचारी, खरेदीदार या सर्वांमध्ये पुरुष कर्मचाºयांचे प्रमाण जास्त असून, मार्केटमध्ये प्रतिदिन ५० ते ६० हजार नागरिकांची ये-जा असते.पालिका व एपीएमसी प्रशासनाने मार्केटमध्ये जनजागृती केली असली, तरी कामगारांनी व इतर सर्वांनीच नियम पाळणे गरजेचे आहे.

कोरोना रुग्णांचा तपशील
विभाग महिला पुरुष एकूण
ऐरोली २१५६ ३१७० ५३२६
बेलापूर २१५२ ३४१३ ५५६५
दिघा ४१७ ७३७ ११५४
घणसोली १७९२ ३०५० ४८४२
कोपरखैरणे २१६१ ३७६६ ५९२७
नेरुळ २६९८ ४१२६ ६८२५
तुर्भे १७२४ २७८५ ४५०९
वाशी १७५३ २५६६ ४३२०
एकूण १४८५३ २३६१३ ३८४६८

Web Title: CoronaVirus News: Men are most at risk of corona in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.