coronavirus: परप्रांतीय मजुरांची गावी जाण्यासाठी धडपड, कुटुंबासह वणवण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 12:28 AM2020-05-14T00:28:18+5:302020-05-14T00:28:28+5:30

कोरोना या महामारीमुळे लॉकडाउन घोषित करण्यात आला, यात अनेक कामगार बेरोजगार झालेले. त्यामुळे ते भेटेल त्या परिस्थितीत आपला गुजारा करीत होते.

coronavirus: Migrant workers struggle to get to the village, family struggles | coronavirus: परप्रांतीय मजुरांची गावी जाण्यासाठी धडपड, कुटुंबासह वणवण

coronavirus: परप्रांतीय मजुरांची गावी जाण्यासाठी धडपड, कुटुंबासह वणवण

Next

- वैभव गायकर
पनवेल : मागील अनेक दिवसांपासून पनवेल परिसरात अडकलेल्या स्थलांतरीय मजुरांची गावी जाण्यासाठी धडपड सुरू आहे. बुधवारी पनवेल परिसरातून तीन ट्रेन अनुक्रमे उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश तसेच झारखंडसाठी रवाना होणार होत्या. यामुळे या परप्रांतीय मजूर कु टुंबासह पनवेल रेल्वेस्थानकावर दाखल झाले होते. गावी जाण्यासाठी या परप्रांतीय नागरिकांना शासनाच्या विविध परवानग्यांसाठी कागदपत्र घेऊन मुलाबाळांसह फिरावे लागत आहे.

कोरोना या महामारीमुळे लॉकडाउन घोषित करण्यात आला, यात अनेक कामगार बेरोजगार झालेले. त्यामुळे ते भेटेल त्या परिस्थितीत आपला गुजारा करीत होते. यापैकी अनेक जण मैदान, पदपथावर राहत होते. बुधवारी पनवेलवरून गाड्या सुटणार असल्याची माहिती मिळताच या मजुरांनी विविध पोलीस ठाण्यात आपल्या नावनोंदणीसाठी धाव घेतली. यापैकी खारघर पोलीसठाण्याच्या हद्दीत या मजुरांनी पहाटेपासून गर्दी केली होती. दुपारी उत्तरप्रदेशला जाणारी गाडी १६०० मजुरांसाठी रवाना झाली. मध्यप्रदेश व झारखंडसाठी प्रत्येकी १६०० मजुरांना घेऊन बुधवारी सायंकाळपर्यंत ट्रेन रवाना होणार होती. दरम्यान, या मजुरांचे मोठे हाल झाले. मजुरासोबत असलेल्या लहान मुलांनाही मोठा त्रास सहन करावा लागला. पोलिसांच्या मदतीने शक्यतो प्रयत्न या मजुरांच्या मदतीसाठी या वेळी करताना दिसून आले. आपत्कालीन परिस्थितीत विविध कायदेशीर प्रक्रिया पार पाडताना या कामगारांना सर्वात जास्त त्रास झाला. झेरॉक्सची दुकाने बंद असल्याने आपल्या कागदपत्रांचे झेरॉक्स काढण्यासाठी या कामगारांना धडपड करावी लागली.

बुधवारी दिवसभरात ४८०० कामगार पनवेल परिसरातून रवाना झाले असले तरी अद्याप हजारो कामगार विविध ठिकाणी अडकलेले आहेत. आम्हाला गावी पोहोचविण्यासाठी प्रशासनाने मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

आम्ही एका खासगी वाहनाने जाण्यासाठी मंगळवारी कळंबोलीला थांबलो होतो. मात्र, मंगळवारी ते वाहन आलेच नाही. बुधवारी पायीच आम्ही खारघर गाठले. त्या ठिकाणी सर्व प्रक्रिया पार पाडून गावी जाण्याची वाट बघतोय. -आशिष सिंग, मजूर, मध्यप्रदेश

मजुरांना गावी पाठविण्यासाठी जी कायदेशीर प्रक्रिया केली जात आहे. ती शिथिल करावी विविध कागदपत्रांसाठी लॉकडाउनच्या काळात अनेक मजुरांची मोठी गैरसोय होत आहे. गावी पाठविण्यासाठी जास्तीत जास्त ट्रेन सोडणे गरजेचे आहे. - राजा ठाकूर, मजूर, बिहार


सायकल घेऊन नऊ कामगारांचे उत्तरप्रदेशकडे प्रयाण
पनवेल : अलिबाग आरसीएफ परिसरात लॉकडाउनमध्ये अडकलेले नऊ कामगार बुधवारी सायकलवर आपल्या मूळगावी उत्तरप्रदेशकडे रवाना झाले. एकूण १६०० किलो मीटर प्रवास करून त्यांना आपले गाव गाठावे लागणार आहे. उपासमारीची वेळ आल्याने त्यांनी हा निर्णय घेतला.
गेल्या मार्च महिन्यापासून कोरोनामुळे देशभर लॉकडाउन सुरू आहे. त्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे, त्यामुळे बांधकाम लगेच सुरू होईल असे चित्र नाही. त्यामुळे याच्याशी निगडित असलेल्या मिस्त्री कामगारांच्या आशा मावळल्या आहेत. अशा प्रकारचे बरेच कामगार रायगड जिल्ह्यात अडकले आहेत. त्यापैकी नऊ जण अलिबाग आरसीएफ येथे लादी बसवण्याचे काम करत होते. लॉकडाउन असल्याने त्यांच्या हाताला काम नाही. त्यामुळे ते बसूनच होते, इतके दिवस होते तितके पैसे खर्च झाले. त्यातच आपल्या मूळ गावी जाण्यासाठी शासकीय अनेक गोष्टींची पूर्तता करावी लागते. त्यातच रेल्वेने जाण्यासाठी आपला नंबर कधी लागेल हे त्यांना माहीत नाही. त्यामुळे सेकंड हॅण्ड सायकल्स खरेदी करून बुधवारी पहाटे ३ वाजता नऊ जण आपल्या उत्तरप्रदेशातील फरिदाबाद जिल्ह्यातील बस्ती या मूळ गावी निघाले.
सकाळी १० वाजता ते नवीन पनवेल या ठिकाणी पोहोचले. बॅगमध्ये बिस्कीट, नमकीन त्यांनी घेतले आहेत. मजल दरमजल करत गाव गाठण्याचा संकल्प या मजुरांनी केला आहे. दुपारी कुठेतरी आराम करायचा रात्री प्रवास करायचा, असा दिनक्रम त्यांनी ठरवलेला आहे. येथे उपाशी मरण्यापेक्षा सायकलवर जाण्याचा आम्ही निर्णय घेतल्याचे हनुमान निस्सार या कामगाराने सांगितले.

Web Title: coronavirus: Migrant workers struggle to get to the village, family struggles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.