Corona Vaccination: नवी मुंबईमध्येही कोरोना लसीचा तुटवडा; ४२ पैकी ३८ केंद्रे बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 01:37 IST2021-04-09T01:37:08+5:302021-04-09T01:37:22+5:30
नवीन डोस मिळाले तरच शुक्रवारी लसीकरण

Corona Vaccination: नवी मुंबईमध्येही कोरोना लसीचा तुटवडा; ४२ पैकी ३८ केंद्रे बंद
नवी मुंबई : शहरामध्ये कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. गुरूवारी फक्त ३५१० डोस शिल्लक असल्यामुळे ४२ पैकी ३८ केंद्र बंद करावी लागली होती. नवीन डोस उपलब्ध झाले तरच शुक्रवारी लसीकरण सुरु ठेवता येणार आहे.
नवी मुंबईमध्ये जास्तीत जास्त नागरिकांना कोरोना लस वेळेत उपलब्ध व्हावी, यासाठी महानगरपालिकेने तब्बल ४२ केंद्र सुरु केली होती. यामध्ये २६ महानगरपालिकेची व १६ खासगी रुग्णालयांमधील केंद्रांचा समावेश होता. बुधवारी रात्रीपर्यंत शहरातील १ लाख ४१ हजार ७९ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले होते. मनपाकडे फक्त ३५१० डोस उपलब्ध होते. गुरूवारी सकाळी डोस उपलब्ध असलेल्या मनपा व खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरू करण्यात आले होते. परंतु, दुपारनंतर जवळपास ३८ केंद्रांमधील लस संपल्यामुळे ती बंद करण्यात आली. मनपाच्या वाशी, ऐरोली, नेरूळ व वाशीतील जम्बो केंद्रात सायंकाळपर्यंत लसीकरण सुरू होते.
महानगरपालिका प्रशासनाने लसीचे डोस उपलब्ध व्हावे, यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. रात्री उशिरा किंवा शुक्रवारी सकाळपर्यंत नवीन डोस मिळाले तरच लसीकरण सुरू ठेवता येणार आहे. अन्यथा सर्व केंद्र बंद ठेवावी लागणार आहेत. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे लसीकरण वेगाने होणे अपेक्षित आहे. परंतु, प्रत्यक्षात मात्र लसीचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे नागरिकांनीही नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी अनेक नागरिक महानगरपालिका व खासगी सेंटरमध्ये लस घेण्यासाठी व नोंदणीसाठी जात होते. परंतु, तेथे लस नसल्याचे सांगितले जात असल्यामुळे नाराज होऊन परत जावे लागत होते.
नागरिकांमध्ये असंतोष
नवी मुंबईमध्ये कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे गुरुवारी अनेक नागरिकांना लसीकरण केंद्रावरून परत घरी जावे लागले. नवीन लस कधी येणार, याविषयीही ठोस माहिती दिली जात नव्हती. यामुळे अनेक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कोरोना रोखण्यासाठी लसीकरणामध्ये खंड पडून देऊ नये. पुरेशी लस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.