शेती व्यवसायाच्या नावाखाली मॉलची उभारणी
By Admin | Updated: May 29, 2017 06:48 IST2017-05-29T06:48:05+5:302017-05-29T06:48:05+5:30
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने माथाडी भवनसमोर कृषी भवनची उभारणी केली असून तेथे कृषीमालाऐवजी इलेक्ट्रॉनिक

शेती व्यवसायाच्या नावाखाली मॉलची उभारणी
नामदेव मोरे/लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने माथाडी भवनसमोर कृषी भवनची उभारणी केली असून तेथे कृषीमालाऐवजी इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विक्री होवू लागली आहे. याच परिसरामध्ये निर्यातभवनच्या नावाखाली मॉलसदृश इमारत उभारली जात असून तेथील दुकानांची रचनाही इतर वस्तूंचा व्यापार करण्यासाठी पूरक ठरेल अशीच करण्यात येत आहे. यामुळे बाजार समितीच्या हेतूवर संशय व्यक्त केला जात असून शेती उत्पादनासाठी मिळालेल्या भूखंडांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप होवू लागला आहे.
मुंबईमधील होलसेल मार्केट नवी मुंबईमध्ये स्थलांतरित केल्यानंतर शासनाने सिडकोच्या माध्यमातून एपीएमसीला जवळपास ७० हेक्टर जमीन उपलब्ध करून दिली आहे. या जमिनीचा शेती व्यवसायासाठीच वापर करण्याची अट घातली आहे. परंतु बाजार समिती प्रशासनाने मोक्याच्या ठिकाणी असलेल्या भूखंडावर व्यावसायिक इमारती उभारून त्या अकृषी व्यवसाय करणाऱ्यांना विकण्याचा धडाका लावला आहे.
माथाडी भवनसमोर प्लॉट नंबर १५ हा बाजार समितीला फळ व भाजीपाला मार्केटसाठी दिला होता. परंतु येथे बाजार समितीने एल टाईप शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधले असून त्यामध्ये तळमजल्यावर २३ गाळे व वरील मजल्यावर कार्यालयांची रचना केली आहे. या परिसरामधील माथाडी भवन, ग्रोमा, नवी मुंबई मर्चंट चेंबर या इमारतीच्या तळमजल्यावरील गाळे किराणा दुकाने, स्टेशनरी व इतर होलसेल व्यापारासाठी देण्यात आले आहेत. याच धर्तीवर कृषी प्लाझाची रचना केली असून कमी किमतीमध्ये गाळ्यांची विक्री करण्यात
आली आहे.
या गाळ्यांमध्ये सद्यस्थितीमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विक्री केली जात आहे. इमारतीचे नाव कृषी प्लाझा असले तरी त्यामधील एकाही गाळ्यात कृषी व्यापार होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
कृषी प्लाझाच्या मागील बाजूला बाजार समितीने निर्यात भवन इमारतीचे बांधकाम सुरू केले आहे. इमारतीचे नाव निर्यात भवन असले तरी तिची रचना कृषी प्लाझाच्या धर्तीवर करण्यात आली आहे. येथेही तळमजल्यावर गाळे तयार करून ते कमी किमतीमध्ये अकृषी व्यापारासाठी विकण्याचा डाव आखला जात आहे.
या इमारतीचे बांधकाम वेगाने सुरू असून त्या ठिकाणी माहिती फलकही लावण्यात आलेला नाही. इमारतीचे काम कधी सुरू करण्यात आले. इमारतीच्या बांधकामावर होणारा खर्च, काम कधी पूर्ण होणार याची माहिती लिहिलेली नाही. भविष्यात कृषी प्लाझाप्रमाणे हे गाळेही विकण्याची शक्यता
व्यक्त केली जात आहे.
शेती व्यापारासाठी मिळालेल्या भूखंडांचा गैरवापर सुरू झालेला असून संबंधित अधिकारी व
या प्रकल्पांना मान्यता देणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी होवू लागली आहे.
निर्यातभवनचाही होणार कृषी प्लाझा
बाजार समितीने कृषी प्लाझाच्या मागील बाजूला निर्यातभवनचे बांधकाम सुरू केले आहे. वास्तविक निर्यातभवन इमारतीची रचना करता त्यामध्ये निर्जंतुकीकरण प्रकल्प, पॅकिंगसाठी पुरेसी जागा, अत्याधुनिक पॅकिंगची यंत्रणा बसविता येईल अशाप्रकारे इमारतीची रचना करणे आवश्यक आहे.
परंतु बाजार समितीने शॉपिंग कॉम्प्लेक्सप्रमाणे रचना करून इमारत उभारण्यास सुरवात केली असून भविष्यात कृषी प्लाझाप्रमाणेच येथील गाळ्यांमध्ये इतर व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी देण्याचे षड्यंत्र सुरू असल्याचे बोलले जात आहे. प्रशासक सतीश सोनी व सचिव शिवाजी पहिनकर यावर काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
कृषी भवन नावापुरतेच
बाजार समितीने बांधकाम केलेल्या कृषी भवनमध्ये शेतीमालाची विक्री करणारे एकही दुकान नाही. पूर्ण इमारतीमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विक्री होत असून एका ठिकाणी डोसा प्लाझा सुरू आहे. बाजार समितीने भूखंडाचा गैरवापर केला असून या प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. मोक्याचे भूखंड धनदांडग्यांच्या घशात घालण्याचे षड्यंत्र सुरू असल्याचीही टीका होवू लागली आहे.