प्रकल्पग्रस्तांसाठी आता कन्स्ट्रक्शन अ‍ॅकॅडमी

By Admin | Updated: February 25, 2016 04:18 IST2016-02-25T04:18:09+5:302016-02-25T04:18:09+5:30

बांधकाम क्षेत्रात आपले करिअर करू इच्छिणाऱ्या प्रकल्पग्रस्तांसाठी सिडकोने कन्स्ट्रक्शन अ‍ॅकॅडमी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या अ‍ॅकॅडमीतून प्रकल्पग्रस्तांना बांधकामाचे

Construction Academy Now for Project Affected Persons | प्रकल्पग्रस्तांसाठी आता कन्स्ट्रक्शन अ‍ॅकॅडमी

प्रकल्पग्रस्तांसाठी आता कन्स्ट्रक्शन अ‍ॅकॅडमी

- कमलाकर कांबळे,  नवी मुंबई
बांधकाम क्षेत्रात आपले करिअर करू इच्छिणाऱ्या प्रकल्पग्रस्तांसाठी सिडकोने कन्स्ट्रक्शन अ‍ॅकॅडमी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या अ‍ॅकॅडमीतून प्रकल्पग्रस्तांना बांधकामाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाणार आहे. भविष्यात येऊ घातलेल्या विविध प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्तांसाठी हे प्रशिक्षण महत्त्वाचे ठरणार आहे.
सिडकोने प्रकल्पग्रस्तांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला आहे. त्यानुसार त्यांच्यासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जात आहेत. यात स्पर्धात्मक परीक्षा, रोजगाराभिमुख, कौशल्य व उद्योजकता विकास आदी सात प्रशिक्षण कार्यक्रमांचा नुकतास शुभारंभ करण्यात आला आहे. त्यापाठोपाठ आता कन्स्ट्रक्शन अ‍ॅकॅडमी सुरू करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. खांदेश्वर येथे ही अ‍ॅकॅडमी सुरू करण्याचा सिडकोचा मानस आहे. आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळ, जेएनपीटी प्रभावित क्षेत्र व नैना परिसरामुळे भविष्यात बांधकाम उद्योगाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. सुमारे ५६१.७२ चौरस किलोमीटर क्षेत्रात नैना प्रकल्प आकारास येणार आहे. प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाच्या सुमारे २५ किमी चौरस परिघातील २७० गावांच्या क्षेत्रातील जमीन शासनाने यासाठी आरक्षित केली आहे. यात रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल, कर्जत, खालापूर, पेण या तालुक्यांतील २५६ तर ठाणे तालुक्यातील १४ गावांचा समावेश आहे. एकूणच भविष्यात बांधकाम उद्योगाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. स्थानिक प्रकल्पग्रस्तांनाही या संधीचा लाभ घेता यावा, बांधकाम क्षेत्रात आपले करिअर घडविण्यासाठी त्यांच्यात उमेद व जिद्द निर्माण व्हावी, या उद्देशाने सिडकोने कन्स्ट्रक्शन अ‍ॅकॅडमीची योजना आखली आहे. प्रकल्पग्रस्तांच्या तरुणांना या अ‍ॅकॅडमीत बांधकाम क्षेत्राशी संबंधित सर्व प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. दोन ते तीन लाखांची कामे विनानिविदा प्रकल्पग्रस्तांना देण्याचे सिडकोचे धोरण आहे. परंतु अनेकांना या क्षेत्राचे ज्ञान नसल्यामुळे त्यांना या संधीचा लाभ घेता येत नाही. अशा प्रकल्पग्रस्तांना ही अ‍ॅकॅडमी उपयुक्त ठरेल, असा विश्वास सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Construction Academy Now for Project Affected Persons