Conservation of historic cannons in Panvel; The municipality will spend between 2.5 and 3 lakhs | पनवेलमधील ऐतिहासिक तोफांचे होणार संवर्धन; महापालिका करणार अडीच ते तीन लाखांचा खर्च

पनवेलमधील ऐतिहासिक तोफांचे होणार संवर्धन; महापालिका करणार अडीच ते तीन लाखांचा खर्च

वैभव गायकर

पनवेल : पनवेल महापालिका मुख्यालयासमोरील शिवकालीन ऐतिहासिक तोफा अडगळीत पडल्याचे वृत्त नुकतेच ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. महापालिका प्रशासनाने या वृत्ताची दखल घेत, तोफांचे जतन करून शास्त्रोक्तरीत्या संवर्धन करण्याचा निर्णय घेतला आहे. एका संस्थेला हे काम देण्यात आले आहे.

२०१० मध्ये पनवेल बंदरात उत्खनादरम्यान आठ शिवकालीन तोफा सापडल्या होत्या. २०११ मध्ये संबंधित तोफांना चंदेरी रंग देऊन त्या पनवेल नगरपरिषद मुख्यालयासमोर, एक चौथरा बांधून दर्शनीय भागात ठेवण्यात आल्या होत्या.

पनवेल नगरपरिषदेचे पालिकेत रूपांतर झाले. यालाही तीन वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र, या दरम्यान तोफा अडगळीत पडल्याचे दिसून येत आहे. एकीकडे पनवेल पालिका मुख्यालयाचे नूतनीकरणाचे काम सुरू असताना तोफांच्या संवर्धनाचे महत्त्व लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे अभ्यासक असलेले अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांनी, तोफांच्या संवर्धनाचा प्रस्ताव तयार केला आहे. आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाने हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तोफा पुनर्जीवित करण्याचे काम श्री शिव सह्याद्री संस्थेला देण्यात आले आहे. तोफांमध्ये केलेली रंगरंगोटी पूर्णपणे काढून त्यांच्यावर रासायनिक प्रक्रिया करण्यात येणार आहे. नगरपरिषद अस्तित्वात असताना चंदेरी रंगाच्या आॅइल पेंटने तोफांची रंगरंगोटी करण्यात आली होती.

या वेळी तोफांमधील दारूगोळा पेटविण्याची छिद्र या रंगरंगोटीत नाहीसे झाले. या सर्व बाबींचा बारकाईने विचार करून या तोफांचे पुनर्जीवित करण्यात येणार आहे, याकरिता सुमारे अडीच ते तीन लाख रुपयांचा खर्च पालिका उचलणार आहे.

पनवेल महापालिकेतील मुख्यालयातील ऐतिहासिक तोफांचे महत्त्व लक्षात घेता त्यांच्या संवर्धनाचे काम पालिकेने हाती घेतले आहे. याकरिता प्रस्ताव तयार करण्यात आला असून लवकरच तोफा आपल्या मूळ स्वरूपात सर्वांना पाहावयास मिळणार आहेत. - डॉ. प्रशांत रसाळ, अतिरिक्त आयुक्त, पनवेल महापालिका

स्वराज्यात पनवेल प्रांताचे महत्त्व

  • पनवेल बंदरातून परदेशात मालाची वाहतूक होत असल्याच्या नोंदी इतिहासात आढळतात.
  • शिवाजी महाराजांनी कल्याण-भिवंडी लुटले, तेव्हा पनवेल प्रांतदेखील स्वराज्याचा घटक बनला.
  • शिवाजी महाराजांच्या कार्यकालात पनवेलचे दाखले वेळोवेळी देण्यात आले आहेत.
  • शिवकाळात पनवेलच्या बंदराच्या संरक्षणासाठी या तोफा धक्क्यावर लावण्यात आल्याने या तोफांना ऐतिहासिक महत्त्व असल्याचे शिवप्रेमी व इतिहासाचे अभ्यासक सागर मुंडे यांनी सांगितले.
  • तोफा पुनर्जीवित करण्याचे काम श्री शिव सह्याद्री संस्थेला देण्यात आले आहे. त्यासाठी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ यांनी प्रस्ताव तयार केला असून अडीच ते तीन लाखांचा खर्च अपेक्षित आहे.

Web Title: Conservation of historic cannons in Panvel; The municipality will spend between 2.5 and 3 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.