निलंबनाविरोधात काँग्रेसची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2015 23:41 IST2015-08-06T23:41:34+5:302015-08-06T23:41:51+5:30

काँग्रेसच्या २५ खासदारांच्या निलंबनाचा निषेध करण्यासाठी जिल्हा काँग्रेसच्या वतीने कोकण भवन कार्यालयावर धडक मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली

Congress's protest against suspension | निलंबनाविरोधात काँग्रेसची निदर्शने

निलंबनाविरोधात काँग्रेसची निदर्शने

नवी मुंबई : काँग्रेसच्या २५ खासदारांच्या निलंबनाचा निषेध करण्यासाठी जिल्हा काँग्रेसच्या वतीने कोकण भवन कार्यालयावर धडक मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. मोदी सरकारची हुकूमशाही थांबवून २५ खासदारांचे निलंबन मागे घ्यावे, तसेच भ्रष्टाचारी मंत्र्यांवर लवकरात लवकर कारवाई करावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष दशरथ भगत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. भ्रष्टाचाराला विरोध करणाऱ्या काँग्रेसच्या २५ खासदारांना सोमवारी ३ आॅगस्ट रोजी पाच दिवसांकरिता निलंबित केले. हे अत्यंत निषेधार्ह आहे. त्याविरुध्द तीव्र संताप व्यक्त केला जात असल्याचे मत जिल्हा कमिटीचे उपाध्यक्ष सुरेश नायडू यांनी व्यक्त केली.
जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने कोकण विभागाच्या प्रशासन विभागाचे उपआयुक्त राजीव द. निवतकर यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनातील मागण्यांच्या अनुषंगाने हा अहवाल राज्य व केंद्र शासनाला पाठविला जाईल, असे आश्वासन निवतकर यांनी दिले. यावेळी ठाणे लोकसभा युवा काँग्रेसचे अध्यक्ष निशांत भगत, काँग्रेसचे सचिव विलासराव यादव, संतोष कांबळे, जिल्हा कॉँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Web Title: Congress's protest against suspension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.