महाराष्ट्र भूषण पुरस्कार दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या श्री सदस्यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांची भरपाई दयावी, काँग्रेसची मागणी
By योगेश पिंगळे | Updated: April 20, 2023 20:18 IST2023-04-20T20:17:50+5:302023-04-20T20:18:47+5:30
ही मागणी काँग्रेसचे प्रवक्ते नासिर हुसेन यांनी गुरुवारी नवी मुंबईतील एका पत्रकार परिषदेत केली.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या श्री सदस्यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांची भरपाई दयावी, काँग्रेसची मागणी
नवी मुंबई : खारघर येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने बळी गेलेल्या श्री सदस्यांच्या कुटुंबियांना शासनाने पाच लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. परंतु ही भरपाई म्हणजे मृत्यू झालेल्या श्री सदस्यांच्या कुटुंबियांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा प्रकार असून सरकारने प्रत्येकी 1 कोटी रुपयांची भरपाई देण्याची मागणी काँग्रेसचे प्रवक्ते नासिर हुसेन यांनी गुरुवारी नवी मुंबईतील एका पत्रकार परिषदेत केली. यावेळी या सोहळ्याच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी देखील करण्यात आली.
खारघर येथे राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात मृत्यू झालेल्या श्री सदस्यांची संख्या सुमारे 50 इतकी असल्याचा अंदाज अजून 200 श्री सदस्य जखमी तर 80 श्री सदस्यांवर अद्याप उपचार सुरु असल्याचे सांगत सरकार खरी आकडेवारी लपवत असल्याचा आरोप यावेळी हुसेन यांनी केला. मृत्यूमुखी पडलेल्या श्री सदस्यांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपये देण्यात यावेत तसेच त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
मुख्यमंत्री आणी उपमुख्यमंत्री यांनी राजीनामे द्यावेत आणी श्री सदस्यांना न्याय न मिळाल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरेल असा इशारा यावेळी त्यांनी दिला. श्री सदस्यांच्या मृत्यू प्रकरणी या सोहळ्याचे आयोजक असणाऱ्या महाराष्ट्र सरकारवर गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी काँग्रेसचे नवी मुंबई प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी केली.