दहावी - बारावीच्या ऑफलाइन परीक्षेमुळे संभ्रम; कोरोनाने वाढवली पालकांची चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 23:06 IST2021-02-25T23:05:50+5:302021-02-25T23:06:02+5:30
कोरोनाने वाढवली पालकांची चिंता : सुरक्षितता महत्त्वाची , सतर्कता बाळगण्याची गरज

दहावी - बारावीच्या ऑफलाइन परीक्षेमुळे संभ्रम; कोरोनाने वाढवली पालकांची चिंता
अरुणकुमार मेहत्रे
कळंबोली : दहावी - बारावीच्या परीक्षा ऑफलाइन होणार, असा निर्णय शिक्षण विभागांकडून घेण्यात आला आहे. ऑनलाइन परीक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानाची पालकांना असलेली भीती टळली आहे. तर बहुतांश पालकांनी ऑफलाइन घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे स्वागत केले आहे. तर काहींना कोरोनामुळे चिंता लागली आहे. पनवेल परिसरातील कोरोना रुग्ण वाढत असल्याने पालकांची परीक्षाबाबत द्विधा मनस्स्थिती निर्माण झाली आहे.
पनवेल तालुक्यात यावर्षी उशिराने शाळा सुरू झाल्या आहेत. कोरोनामुळे ऑनलाइन क्लासेस तर शाळा सुरू झाल्यानंतर ऑफलाइन तासिका घेण्यात आल्या आहेत. प्रत्येक शाळांना कोरोना नियमाचे पालन करणे अनिवार्य होते. त्यामुळे तासिकेची विभागणी आणि मर्यादित विद्यार्थी संख्या असल्याने शिक्षकांवर तसेच विद्यार्थांवर अभ्यासक्रमाचे ओझे होते. त्यातूनही शिकवणी पूर्ण करण्यात शिक्षकांकडून प्रयत्न करण्यात आले आहे. सराव परीक्षासुद्धा काही प्रमाणात झाल्या आहेत.
आता बोर्डाकडून ऑफलाइन परीक्षा घेण्यात येणार, असा निर्णय झाल्यानंतर काही पालकांनी आनंद व्यक्त केला आहे. तर काहींनी चिंता वर्तवली आहे. ऑनलाइन घेऊच नये, असे मत काही पालकांनी व्यक्त केले आहे. दहावी - बारावीचे वर्ष महत्त्वपूर्ण आहे. ऑनलाइनमुळे कॉपी करण्याचे प्रकार घडू शकतात तेव्हा परीक्षा ऑफलाइनच व्हावी, असेही काही पालकांकडून सांगण्यात आले आहे. तर काहींना केंद्रावर योग्य काळजी घेतली जाईल की नाही, ही चिंता सतावत आहे.