निर्माल्यातून कंपोस्ट खताची निर्मिती
By Admin | Updated: September 26, 2015 01:21 IST2015-09-26T01:21:05+5:302015-09-26T01:21:05+5:30
सध्या ग्लोबल वॉर्मिंगचा धोका संपूर्ण जगाला भेडसावत आहे. निसर्गाला पूरक सण साजरे करण्यासाठी विविध सामाजिक संस्था पुढाकार घेत आहेत

निर्माल्यातून कंपोस्ट खताची निर्मिती
वैभव गायकर , पनवेल
सध्या ग्लोबल वॉर्मिंगचा धोका संपूर्ण जगाला भेडसावत आहे. निसर्गाला पूरक सण साजरे करण्यासाठी विविध सामाजिक संस्था पुढाकार घेत आहेत. गणेशोत्सव हा सण मोठ्या प्रमाणात मुंबई उपनगरात साजरा केला जातो. विसर्जनावेळी अनेक जण निर्माल्य पाण्यात विसर्जित करतात. त्यामुळे जलप्रदूषण होतेच तसेच पाण्यामधील जीवसृष्टीला देखील धोका निर्माण होतो. लोकांच्या धार्मिक भावना जोडलेल्या असल्यामुळे जनजागृती करुन देखील ही बाब नागरिकांच्या लक्षात येत नाही. मात्र डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने निर्माल्यातून कंपोस्ट खताची निर्मिती करण्याचा प्रयोग हाती घेतला आहे. खारघरमध्ये हा प्रयोग राबविला जात असून या उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद लाभल्यास संपूर्ण मुंबईभर हा उपक्रम राबविला जाणार आहे.
खारघरमध्ये तीन विसर्जित ठिकाणी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. विसर्जनासाठी आलेल्या मूर्तींना विसर्जित करुन त्याठिकाणचे निर्माल्य एकत्र करण्याचे काम हे स्वयंसेवक करीत आहेत. खारघरमध्ये कोपरा तलाव, मुर्बी तलाव, खारघर गावाजवळील विसर्जन घाटावर हे स्वयंसेवक हे निर्माल्य एकत्र करण्याचे काम करीत आहेत. खारघरमधील दीड दिवसाच्या ९५१ मूर्ती या ४९ स्वयंसेवकांनी विसर्जित केल्या व त्याठिकाणचा एकूण ४ टन निर्माल्य गोळा करण्यात आले आहे. तसेच पाच दिवसांच्या १४०९ मूर्तींना ७४ स्वयंसेवकांनी विसर्जित करुन जवळजवळ साडेपाच टन निर्माल्य जमा केले आहे. अशा दोन दिवसांचे साडेनऊ टन निर्माल्य खारघर गावाजवळील अंबिका भवन याठिकाणच्या मोकळ्या जागेत पुरुन त्यावर कंपोस्ट खतासाठी प्रक्रिया सुरु केली आहे. खारघर शहरामध्ये डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने तळोजा मध्यवर्ती कारागृहात एक हजार वृक्षांची लागवड काही महिन्यापूर्वी केली होती. त्यांच्या संवर्धनासाठी हे खत वापरले जाणार आहे. विशेष म्हणजे या उपक्रमामुळे निर्माल्यातून होणारा कचऱ्याची आपोआप विल्हेवाट लागणार असून जलप्रदूषण थांबणार आहे. तसेच यापासून निर्माण होणारे खत शेतीसाठी देखील वापरता येणार आहे.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने राबविलेल्या या उपक्रमासाठी विसर्जित ठिकाणी निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत. तसेच दहा दिवसांच्या विसर्जनावेळी देखील मोठ्या संख्येने स्वयंसेवक विसर्जित ठिकाणी उपस्थित राहून निर्माल्य एकत्र करणार आहेत. या उपक्रमाला नागरिकांचा देखील चांगला प्रतिसाद लाभत असून खारघरमधील हा उपक्रम यशस्वी झाल्यास मुंबई उपनगरात देखील अशाप्रकारचा उपक्रम राबविण्यात येईल.