आयुक्त हटाव मोहीम तीव्र, भाजपाचे दबावतंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 00:57 IST2018-03-28T00:57:14+5:302018-03-28T00:57:14+5:30
पालिका आयुक्त डॉ . सुधाकर शिंदे यांच्याविरोधात अविश्वास ठराव पारित केल्यांनतर भाजपाने आयुक्तांच्या बदलीविरोधात मोहीम तीव्र केली आहे

आयुक्त हटाव मोहीम तीव्र, भाजपाचे दबावतंत्र
पनवेल : पालिका आयुक्त डॉ . सुधाकर शिंदे यांच्याविरोधात अविश्वास ठराव पारित केल्यांनतर भाजपाने आयुक्तांच्या बदलीविरोधात मोहीम तीव्र केली आहे. महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृहनेते परेश ठाकूर यांच्यासह सर्व सभापतींनी आपल्या दालनाबाहेर पालिकेत कामकाज न करता भाजपा कार्यालयात कामकाज करणार असल्याचे पत्रक लावले आहे.
आयुक्तांविरोधातील अविश्वास ठराव शासन दरबारी अद्याप पोहोचलाही नसेल, त्यापूर्वीच भाजपाने आयुक्तांच्या बदलीसाठी दबावतंत्राचा वापर सुरू केला आहे. अविश्वास ठराव अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी हा ठराव मंजूर केल्यानंतरच आयुक्त शिंदेची बदली होणार आहे. मात्र, तत्पूर्वीच पनवेलमधील सत्ताधारी भाजपा आयुक्तांच्या बदलीसाठी जास्तच आग्रही असल्याचे दिसून येत आहे. पालिकेतील महापौर, विषय समित्यांचे सभापती, सभागृहनेते यांची दालने दि. २७पासून बंद राहणार असल्याचे या पत्रकानुसार स्पष्ट करण्यात आले आहे. ही पत्रके पालिकेच्या नव्या इमारतीच्या आवारात लावण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, महापौर, विषय समितीचे सभापती, नगरसेवक, सभागृह नेते आदींचे सर्वांचे काम भाजपा कार्यालय पनवेल या ठिकाणाहून चालणार आहे. त्यामुळे नागरिकांना काही काम असल्यास पालिकेऐवजी भाजपा कार्यालयाचे खेटे मारावे लागणार आहेत. भाजपाच्या या भूमिकेमुळे नागरिकांची गैरसोय होणार आहे. मात्र, हा निर्णय घेण्यामागे आयुक्तांनीच आम्हाला भाग पाडले असल्याचे सत्ताधारी भाजपाचे म्हणणे आहे.
आयुक्त सुधाकर शिंदे हे पालिकेतील कर्मचाऱ्यांना भाजपाच्या पदाधिकाºयांचे ऐकू नका, अशा सूचना देत आहेत. त्यांचे ऐकून पालिका कर्मचारी आमचे ऐकत नाहीत. असे असेल तर नागरिकांचे प्रश्न कसे काय सुटतील म्हणून आम्ही भाजपा कार्यालयात बसून नागरिकांची दैनंदिन कामे करणार आहोत
- परेश ठाकूर,
सभागृहनेते,
पनवेल, महापालिका