उरणमध्ये सीएनजी पंपचालक-रिक्षाचालकांमध्ये जुंपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 00:22 IST2019-09-21T00:21:00+5:302019-09-21T00:22:42+5:30
सीएनजी पंपचालकांच्या मनमानी कारभारामुळे त्रस्त झालेल्या काही संतप्त रिक्षाचालकांनी पंपावर हल्लाबोल करीत कर्मचाऱ्यांना मारहाण केली

उरणमध्ये सीएनजी पंपचालक-रिक्षाचालकांमध्ये जुंपली
उरण : येथील सीएनजी पंपचालकांच्या मनमानी कारभारामुळे त्रस्त झालेल्या काही संतप्त रिक्षाचालकांनी पंपावर हल्लाबोल करीत कर्मचाऱ्यांना मारहाण केली, यामुळे सीएनजी चालकाने घेतलेल्या पंप बंद करण्याच्या ताठर भूमिकेनंतर उरणमधील काही संघटनांनी शुक्रवार, २० रोजी तीन तास रिक्षा बंद ठेवून निषेध व्यक्त केला, यामुळे प्रवाशांची बंद दरम्यान गैरसोय झाली.
उरण तालुक्यातील हजारो सीएनजी वाहनांसाठी फुंडे येथील एकच खासगी पंप आहे. एकच सीएनजी पंप असलेल्या पंपावर दररोज मोठी रांग असते. मध्येच कधी वीजपुरवठा खंडित होतो, तर कधी सीएनजी गॅसच संपल्याचा प्रकार घडतो. त्यामुळे मात्र तासन्तास रांगेत उभे राहूनही जर वाहनचालकांना सीएनजी गॅस उपलब्ध न झाल्यास वाहनचालक विशेषत: रिक्षाचालक आणि पंपचालकांमध्ये नेहमीच वादाची ठिणगी पडते. हे नित्याचेच झाले आहे. गुरुवार, १९ रोजी असाच काहीसा प्रकार घडला आणि रांगेत तासन्तास उभे राहूनही गॅस उपलब्ध होत नसल्याने संतप्त झालेले काही रिक्षाचालक व पंपचालक कर्मचाºयामध्ये जोरदार जुंपली. बाचाबाची, शिवीगाळीनंतर प्रकरण हातघाईवर आले. त्यामुळे काही रिक्षाचालकांनी पंपचालकाला मारहाण केली. पंपाच्या काचा फोडल्या. या घटनेमुळे पंपचालकाने पंपच बंद केला.
सीएनजी पंपचालकाच्या मनमानी कारभाराचा फटका सर्वच रिक्षाचालकांना बसला. यामुळे संतप्त झालेल्या रिक्षाचालकांनीही पंपचालकाने चालविलेल्या मनमानी कारभाराविरोधात रिक्षा बंदचे हत्यार उपसले, त्यामुळे उरण शहर व परिसरातील २५०० रिक्षाचालकांनी बंद पाळून निषेध व्यक्त केला, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल उर्फ अण्णा पुरोगामी यांनी दिली. या वेळी त्यांनी सीएनजी पंपचालकाच्या मनमानी कारभाराचाही पाढा वाचला. या प्रकरणी भाजपनेते महेश बालदी यांची रिक्षा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भेट घेतली. या बैठकीत पंप चालकाने तत्काळ सेवा उपलब्ध करून देण्याच्या आश्वासनानंतर तीन तास बंद करण्यात आलेली रिक्षा वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आल्याची माहितीही पुरोगामी यांनी दिली.
सीएनजी पंप डिलर गौतम कुटे यांनीही काही अज्ञात रिक्षाचालकांनी नाहक मारहाण करून पंपाची नासधूस केली असल्याचे सांगितले. या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. सीएनजी पंप आणि रिक्षा वाहतूक पूर्ववत सुरू झाली असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत असल्याची माहिती उरण वपोनि जगदिश कुलकर्णी यांनी दिली.
।दररोज पाच-सहा गाड्यांनी सीएनजी पुरवठा केला जातो. मात्र, उरण परिसरातील दररोजच्या वाहतूककोंडीच्या समस्येमुळे कधी कधी दोन-तीनच गॅसच्या गाड्या उपलब्ध होतात. तर कधी वीजप्रवाह खंडित होतो. या कारणांमुळे वाहनांना सीएनजी उपलब्ध करून देण्यात अडचणी निर्माण होतात. मात्र, वाहनचालकांकडून सहकार्याची अपेक्षा असताना चालकांकडून अडचणी समजून घेतल्या जात नाहीत, अशी खंतही पंप कर्मचारी गौतम कुटे यांनी व्यक्त केली.