विसर्जन तलाव परिसरात स्वच्छता
By Admin | Updated: March 25, 2017 01:37 IST2017-03-25T01:37:35+5:302017-03-25T01:37:35+5:30
महापालिकेच्या वतीने ऐरोली येथे जलाशय स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या वेळी विविध मंडळांच्या सहकार्याने विसर्जन

विसर्जन तलाव परिसरात स्वच्छता
नवी मुंबई : महापालिकेच्या वतीने ऐरोली येथे जलाशय स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या वेळी विविध मंडळांच्या सहकार्याने विसर्जन तलावाभोवतीच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली. १६ ते ३१ मार्च दरम्यान शहरात जलाशयांसाठी स्वच्छता अभियान राबवले जात असून, त्याअंतर्गत ऐरोलीत मोहीम राबवण्यात आली.
२२ मार्च रोजी झालेल्या जागतिक जल दिनाच्या औचित्यावर स्वच्छ भारत मिशनअंतर्गत महापालिकेतर्फे विशेष स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले आहे. त्याअंतर्गत शहरातील सर्व जलाशयांभोवतीची स्वच्छता करून जलशुद्धीकरणाचा प्रयत्न केला जात आहे. त्याकरिता १६ ते ३१ मार्चदरम्यान शहरात जलाशयांची स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. यानुसार शुक्रवारी ऐरोली सेक्टर २० येथील विसर्जन तलाव परिसराची स्वच्छता करण्यात आली. या वेळी पालिका अधिकाऱ्यांसह मानवता ग्रुप, एकता ग्रुप, पतंजली ग्रुप, हास्य ग्रुप यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी परिसरातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत, विसर्जन तलावात निर्माल्य न टाकण्याचा संदेश दिला. तसेच प्लास्टिकच्या पिशव्या पर्यावरणाला घातक असल्याने त्याचा वापर टाळण्याचाही सल्ला दिला.