कळंबोली सर्कलच्या अंडरपास कामामुळे वाहनकोंडीत अडकले बारावीचे विद्यार्थी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 06:35 IST2025-02-12T06:35:18+5:302025-02-12T06:35:45+5:30
कळंबोली जंक्शन सुधारणा प्रकल्पाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतले आहे.

कळंबोली सर्कलच्या अंडरपास कामामुळे वाहनकोंडीत अडकले बारावीचे विद्यार्थी
अरुणकुमार मेहत्रे
कळंबोली : कळंबोली सर्कल येथील अंडरपासचे काम करण्यासाठी मंगळवारपासून मुंब्रा-जेएनपीटी महामार्ग बंद करण्यात येणार होता. त्यामुळे सकाळपासून अवजड वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र, सकाळपासून सुरू झालेल्या वाहतूक कोंडीत बारावीची परीक्षा देणारे विद्यार्थी अडकल्याने पालकवर्गातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.
इयत्ता बारावीच्या परीक्षेला ११ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी तळोजा येथील विद्यार्थी परीक्षा सेंटरवर उशिरा पोहोचल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनी नाराजी व्यक्त केली. कळंबोली जंक्शन सुधारणा प्रकल्पाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतले आहे. त्यानुसार अंडरपास कामासाठी मंगळवारपासून मुंब्रा-जेएनपीटी महामार्ग बंद करणार असल्याचे सांगण्यात आले होते.
अर्धा तास परीक्षार्थी वाहतूककोंडीत
पहाटेपासूनच अवजड वाहनांची मुंब्रा-जेएनपीटी महामार्गावर गर्दी झाली होती. याचा फटका बारावीच्या परीक्षार्थ्यांना बसला. कळंबोली सर्कल ते मुंब्रा महामार्गावर एक किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तळोजा परिसरातून पनवेल येथे येण्यासाठी अर्धा तास शाळकरी मुले, परीक्षार्थी वाहतूक कोंडीत अडकले होते.
महामार्ग बंद झालाच नाही
मंगळवारपासून सहा महिन्यांकरिता कळंबोली सर्कल येथे मुंब्रा-जेएनपीटी महामार्ग अंडरपास कामासाठी बंद करण्यात येणार होता. मात्र, नियोजन नसल्याने महामार्ग बंद करण्यात आला नाही. कल्याण, ठाणे, नवी मुंबई परिसरातील वाहनधारकांना मंगळवारपासून महामार्ग बंद होणार असल्याने सकाळचे दोन तास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.