नवी मुंबई : देशातील सर्वात मोठ्या कला क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून राज्यात सुरू झालेल्या सीएम चषकामुळे होतकरू खेळाडूंना मोठी संधी निर्माण झाली आहे. नवी मुंबईतील होतकरू खेळाडूंनी या संधीचा लाभ घेत, सीएम चषक नवी मुंबईत आणावा आणि क्रीडा क्षेत्रात नवी मुंबई शहराचे नाव राज्यात उंचवावे, असे आवाहन आमदार मंदा म्हात्रे यांनी खेळाडूंना केले आहे. गुरुवार, १ नोव्हेंबर रोजी बेलापूर मतदार संघात या स्पर्धेची सुरु वात करण्यात आली. यानिमित्ताने नेरुळ येथे आगरी कोळी सांस्कृतिक भवन येथे आयोजित केलेल्या कार्यक्र मात आमदार म्हात्रे बोलत होत्या.नवी मुंबईत सुरू झालेल्या या सामन्यांमध्ये चित्रकला, रांगोळी, गायन आणि नृत्य या स्पर्धांमध्ये नवी मुंबईतील होतकरू स्पर्धक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार रमेश पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ‘खेल इंडिया’ म्हणून हा क्रीडा प्रकार सुरू केला असल्याचे सांगत, यामुळे देशातील खेडे गावापासून ते शहरातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळणार असल्याचे सांगितले. या स्पर्धेच्या माध्यमातून देशातील ५० लाख युवकांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या एकत्र आणण्याचा हेतू असून, या स्पर्धेचे आयोजनही चांगल्या प्रकारे करण्यात आल्याचे भाजपाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी सांगितले. तसेच आजपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेचा मान आमदार म्हात्रे यांना मिळाला असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्र माला भाजपाच्या सचिव अरुणा पाटकर, नवी मुंबई महिला जिल्हाध्यक्ष दुर्गा ढोक, नवी मुंबई युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे, युवती अध्यक्षा सुहासिनी नायडू, नगरसेवक सुनील पाटील, दीपक पवार, महामंत्री राजेश पाटील, कृष्णा पाटील, विजय घाटे, संपत शेवाळे आदी मान्यवर, पदाधिकारी, नागरिक आणि खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शहराचे नाव राज्यात उंचवा; मंदा म्हात्रे यांचे खेळाडूंना आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 00:20 IST