Citizens are angry over the increase in lockdown in Panvel after ten days | पनवेलमध्ये दहा दिवसांनी लॉकडाऊन वाढल्याने नागरिकांमध्ये नाराजी

पनवेलमध्ये दहा दिवसांनी लॉकडाऊन वाढल्याने नागरिकांमध्ये नाराजी

- वैभव गायकर ।

पनवेल : महानगरपालिका क्षेत्रात १४ ते २४ जुलैदरम्यान दहा दिवसांचा पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही दहा दिवसांचा लॉकडाऊन घेण्यात आला होता, परंतु त्यानंतरही कोरोना रुग्णांची संख्या वाढत राहिली. लॉकडाऊनमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे शक्य होत नसेल, तर कशाला हवा आहे, अशी प्रतिक्रिया पनवेलकरांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पडसाद उमटताना दिसत आहेत.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या तीन हजारांच्या वर पोहोचली आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या, तर अनेक व्यावसायिकांचे व्यवसाय ठप्प पडले आहेत. अशा परिस्थितीत लॉकडाऊन कायम राहिले, तर भविष्यात परिस्थिती आणखी बिकट होईल, अशी भीती नागरिक व्यक्त करीत आहेत. एकीकडे घरभाडे व इतर खर्च सुरू असताना किती दिवस घरी बसणार? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. व्यापारी वर्गही कमालीचा हैराण झाला आहे. अशाप्रकारे लॉकडाऊन लागू करण्यापूर्वी व्यापाऱ्यांबरोबर चर्चा करण्याची गरज होती, असे मत होलसेल पनवेल मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष दिनेश मीरानी यांनी व्यक्त केले आहे. सर्वच जण आपल्या घरी अन्नधान्याचा साठा करतात, असा प्रकार नाही. हातावर पोट असणारे अनेक जण रोज सामान भरत असतात. अशा नागरिकांची मोठी गैरसोय होणार असल्याचे मीरानी म्हणाले. कोविडच्या काळात कर्मचाºयांचा तुटवडा भासत असताना आम्ही घरपोच सामान देऊ शकत नाही. प्रशासनाने सामान लोडिंग अनलोडिंगला परवानगी देणे गरजेचे आहे. त्यातच लॉकडाऊन वाढविताना नागरिक, तसेच व्यापारी वर्गाला पुन्हा एकदा ठरावीक वेळ देण्याची गरज होती. मात्र, तसे झाले नसल्याने पुन्हा एकदा जीवनावश्यक साहित्याचा पुरवठा कसा करायचा, असा प्रश्न उपस्थित झाल्याचे मीरानी यांचे म्हणणे आहे. दि होलसेल पनवेल मर्चंट असोसिएशन व पनवेल व्यापारी संघटना (किरकोळ) या दोन्ही संघटनांमध्ये रिटेल व खाद्यपदार्थांसह इतर व्यवसाय करणाºया ३५० ते ४०० व्यापाºयांचा समावेश आहे. लॉकडाऊनमध्ये नागरिकांची, तसेच व्यापाºयांची गैरसोय होणार नाही, याबाबत पालिके ने विचार करणे गरजेचे असल्याचे मीरानी म्हणाले.
लोकप्रतिनिधींनीही या लॉकडाऊनच्या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. शेकाप नगरसेवक हरेश केणी यांनी याबाबत आयुक्त सुधाकर देशमुख यांना पत्र लिहून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लॉकडाऊन करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले गेले नाही. लॉकडाऊन हा पर्याय होऊ शकत नसल्याचे केणी यांनी स्पष्ट केले.

भाज्या खरेदीसाठी धावाधाव : गर्दी टाळण्यासाठी पालिकेने काउंटर विक्री बंद केली असली, तरी अनेक जण भाज्या, फळांच्या खरेदीसाठी घराबाहेर पडत आहेत. अशा वेळी उघड्यावर विक्रीला बंदी असल्याने पोलीस अथवा पालिका कर्मचारी येताच, फेरीवाल्यांसह नागरिकांची मोठी धावाधाव होत आहे.

सोशल मीडियावर नेटकºयांचा उद्रेक
दहा दिवसांनी लॉकडाऊन वाढवल्याचे कळताच सोशल मीडियावर या लॉकडाऊनच्या विरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली. अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत, नोकºया गेल्या, अनेकांना रोजगाराचा प्रश्न सतावत आहे. नव्याने सुरुवात करण्यासाठी लॉकडाऊन शिथिलता होेण्याची गरज असल्याचे नागारिकांचे म्हणणे आहे.

महापालिकेचे नागरिकांना अवाहन
कोरोनाच्या नियंत्रणासाठी पालिकेने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे अवाहन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले आहे. चाचण्या घेण्याचे प्रमाण वाढले असले, तरी मोठ्या संख्येने रुग्णसंख्या वाढली नसल्याचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Citizens are angry over the increase in lockdown in Panvel after ten days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.