खांदा कॉलनीतील ‘त्या’ भूखंडावर सिडकोचा गृहप्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 01:54 IST2019-11-08T01:54:09+5:302019-11-08T01:54:52+5:30
कुंपण घालण्याचे काम सुरू : पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी खबरदारी

खांदा कॉलनीतील ‘त्या’ भूखंडावर सिडकोचा गृहप्रकल्प
नवी मुंबई : खांदा कॉलनीतील सेक्टर ८ मधील अतिक्रमणमुक्त केलेल्या त्या भूखंडावर गृहप्रकल्प उभारण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. या भव्य गृहप्रकल्पात आर्थिक दुर्बल व अल्प उत्पन्न घटकांसाठी घरे निर्माण करण्याची सिडकोची योजना आहे. यासंबंधीचा आराखडा तयार करण्यात आला असून लवकरच प्रस्तावित गृहप्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती सिडकोच्या अभियांत्रिकी विभागाकडून प्राप्त झाली आहे.
खांदा कॉलनीतील सेक्टर ८ मध्ये अगदी मोक्याच्या ठिकाणी हा भूखंड आहे. सुमारे ५५,000 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या या भूखंडावर मागील अनेक वर्षांपासून फेरीवाले व इतर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले होते. तसेच या भूखंडाचा काही भाग सार्वजनिक कार्यक्रमासाठीसुद्धा वापरला जात होता. गेल्या काही वर्षांत येथील अतिक्रमणांच्या विरोधात अनेकदा तक्रारी करण्यात आल्या. परंतु स्थानिक पुढाऱ्यांचा वरदहस्त आणि संबंधित विभागातील अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष यामुळे येथील अतिक्रमणांना वेळोवेळी अभय मिळाले. मात्र बुधवारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात येथील शेकडो फेरीवाले, मासळी मार्केट व इतर अतिक्रमणे हटविण्यात आली. गुरुवारी पत्र्याचे कुंपण लावून सिडकोने हा भूखंड संरक्षित केला आहे. आता या भूखंडावर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत भव्य गृहप्रकल्प उभारला जाणार आहे. त्यादृष्टीने सिडकोने यापूर्वीच तयारी केली असून कंत्राटदाराचीसुद्धा नेमणूक करण्यात आल्याची माहिती सिडकोचे मुख्य अभियंता एस. के. चौटालिया यांनी दिली.
मागील काही वर्षांपासून सिडकोने पुन्हा घरनिर्मित्तीवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार पुढील काही वर्षांत तब्बल दोन लाख घरे बांधण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय सिडकोने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात ९५ हजार घरांचा आराखडा सिडकोने तयार केला आहे. त्यापैकी ९ हजार घरांच्या नोंदणीलाही सुरुवात करण्यात आली आहे. बस आगार, ट्रक टर्मिनल्स, रेल्वे स्थानकांचा परिसर, शहरात विनावापर पडून असलेले भूखंड, अतिक्रमण झालेले भूखंड आदी ठिकाणी ही घरे बांधली जाणार आहेत. खांदा कॉलनीतील साडेपाच हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या या भूखंडावर मागील अनेक वर्षांपासून फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले होते.
विशेष म्हणजे हा भूखंड अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहे. त्यामुळे तो अतिक्रमणमुक्त करून त्या ठिकाणी भव्य गृहप्रकल्प उभारण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.
५५,000 चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड
च्सिडकोच्या माध्यमातून सध्या खारघर, तळोजा, द्रोणागिरी या विभागात गृहप्रकल्पांचे काम सुरू आहे. पनवेलमध्ये एकही गृहप्रकल्प सुरू नाही.
च्पनवेल, खांदा कॉलनी, कामोठे हे विकसित नोड असून येथील घरांच्या किमतीही तुलनात्मकदृष्ट्या अधिक आहेत. खांदा कॉलनीतील ५५,000 चौरस मीटर क्षेत्रफळांचा भूखंड अगदी दर्शनी भागात आहे.
च्त्यामुळे येथील प्रस्तावित घरांना चांगली मागणी मिळेल, असा विश्वास सिडकोला वाटतो आहे.