सिडकोची अतिक्रमण विरोधी मोहीम थंडावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2016 02:35 IST2016-04-20T02:35:43+5:302016-04-20T02:35:43+5:30
प्रकल्पग्रस्तांचा तीव्र विरोध, पोलीस बंदोस्ताचा अभाव आणि बांधकामे नियमित करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलिकडेच

सिडकोची अतिक्रमण विरोधी मोहीम थंडावली
नवी मुंबई : प्रकल्पग्रस्तांचा तीव्र विरोध, पोलीस बंदोस्ताचा अभाव आणि बांधकामे नियमित करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलिकडेच जाहिर केलेली भूमिका आदीमुळे सिडकोच्या अतिक्रमण विरोधी मोहिमेला खीळ बसली आहे. याचा फायदा भूमाफियांनी घेतला असून त्यामुळे शहरात नवीन बांधकामांचा धडाका सुरू झाला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सिडकोने बेकायदा बांधकामांच्या विरोधात जोरदार मोहिम उघडली आहे. त्यानुसार काही दिवसांपूर्वी ५६९ अनधिकृत बांधकामांचा सहभाग असलेली दुसरी यादी जाहीर करण्यात आली. विशेष म्हणजे ही सर्व बांधकामे जून २0१५ नंतर पूर्ण झालेली आहेत. या बांधकामांवर टप्प्याटप्प्याने कारवाई करण्याची योजना सिडकोने तयार केली आहे. दरम्यान, जून २0१५ अगोदर अर्धवट अवस्थेत असलेल्या परंतु त्यानंतरच्या काळात बांधकाम पूर्ण करून त्याचा वापर सुरू असलेल्या इमारतींवरसुद्धा कारवाई करण्याचे सुतोवाच सिडकोकडून करण्यात आले होते. त्यानुसार उरण व पनवेल तालुक्यातील काही बांधकामांवर कारवाई करून सिडकोने दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभसुध्दा केला.
सिडकोने जाहिर केलेल्या दुसऱ्या टप्यातील यादीत सर्वाधिक म्हणजेच ४१३ बांधकामे महापालिका कार्यक्षेत्रातील आहेत. या बांधकामांवरील कारवाईसंदर्भात महापालिकेची भूमिका सुध्दा गुलदस्त्यात आहे. यातच स्थानिक प्रकल्पग्रस्तांचा विरोध, पोलीस बंदोबस्ताचा अभाव तसेच राजकीय हस्तक्षेप आदी कारणांमुळे महापालिका हद्दीतील बेकायदा बांधकामांवर कारवाई करताना सिडकोची अडचण होत आहे. यातच परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या महिन्यात डिसेंबर २0१५ पर्यंतची सरसकट सर्वच बांधकामे नियमित करण्याची घोषणा केल्याने कारवाई संदर्भात सिडकोची संभ्रमावस्था झाली आहे. (प्रतिनिधी)