सिडकोच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना पुन्हा बसली खीळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 23:41 IST2021-04-20T23:41:06+5:302021-04-20T23:41:13+5:30
कोरोनाचा फटका : दीड महिन्यात हजारो मजुरांचे स्थलांतर

सिडकोच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना पुन्हा बसली खीळ
- कमलाकर कांबळे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजविला आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या कष्टकरीवर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. परिणामी, मागील दीड महिन्यात हजारो मजुरांनी स्थलांतर केले आहे. मजूर नसल्याने सुरू असलेली विकासकामेही ठप्प पडली आहेत. याचा सर्वाधिक फटका सिडको महामंडळाला बसला आहे.
सिडकोच्या माध्यमातून मेट्रो, अंतरराष्ट्रीय विमानतळ, जलवाहतूक आदी महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची कामे सुरू आहेत; परंतु मजुरांअभावी मागील दीड महिन्यापासून हे सर्व प्रकल्प ठप्प पडले आहेत. गेल्या वर्षी मार्च महिन्यात पहिली लाट आली. त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी देशभरात ताळेबंदी घोषित करण्यात आली. या ताळेबंदीमुळे अनेक उद्योग बंद पडले. अनेकांच्या नोकरीवर गदा आली. कष्टकऱ्यांचा रोजगार हिरावला. त्यामुळे मजुरांनी मोठ्या प्रमाणात मूळ गावी स्थलांतर केले. मजुरांच्या स्थलांतराचा थेट फटका विकास प्रकल्पांना बसला. याची सर्वाधिक झळ सिडकोला बसली आहे. सिडकोच्या माध्यमातून सध्या आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळ, नवी मुंबई मेट्रो, तसेच पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मेगागृह प्रकल्पाची कामे सुरू आहेत. गेल्या वर्षी मिशन बिगिन अगेनअंतर्गत राज्य सरकाने विविध टप्प्यांत ठप्प पडलेल्या विकासकामांना गती देण्याच्या सूचना संबंधित प्राधिकरणांना दिल्या होत्या. त्यानुसार सिडकोने पहिल्या टप्प्यात रखडलेला मेट्रो प्रकल्प, वॉटर ट्रान्स्पोर्ट आणि आवास योजनेच्या कामाला गती दिली होती. ही कामे अंतिम टप्यात आली असतानाच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने तोंड वर काढले. त्यामुळे ताळेबंदींच्या भीतीने अनेक मजुरांनी स्थलांतर केले. परिणामी, हे प्रकल्प पुन्हा रखडले आहेत.
कोरोनामुळे गेल्या वर्षी सिडकोचे आर्थिक नियोजन फसले. त्यामुळे सिडकोची आर्थिक कोंडी झाली. त्यामुळे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी आर्थिक नियोजनावर भर दिला. उत्पन्नवाढीबरोबरच रखडलेल्या प्रकल्पांना गती दिली. सिडकोची रिक्त झालेली तिजोरी भरण्यासाठी भूखंड विक्रीवर भर दिला, तसेच सुरू असलेले प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीनेसुद्धा सकारात्मक प्रयास केले. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हे प्रयत्न फोल ठरताना दिसत आहेत.
६० हजार कोटींच्या
प्रकल्पांची रखडपट्टी
nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो, पंतप्रधान आवास योजना, नैना प्रकल्प, खारघर कार्पोरेट पार्क, खारघर ते उलवे सागरी मार्ग, ऐरोसिटी प्रकल्प, नवी मुंबई- मुंबई जल वाहतूक, कोंढाणे धरणाची उभारणी, हेटवणे पाणीपुरवठा योजना आदी सुमारे ६० हजार कोटी रुपये खर्चाचे प्रकल्प सिडकोने हाती घेतले आहेत.
nमिशन बिगिन अगेनअंतर्गत यापैकी काही प्रकल्पांना युद्धपातळीवर चालना देण्यात आली; परंतु मजुरांनी स्थलांतर केल्याने या कामांना पुन्हा खीळ बसली आहे.
ताळेबंदीच्या भीतीने मजुरांनी मोठ्या प्रमाणात स्थलांतर केले आहे. त्याचा मोठा फटका सिडकोच्या विकासकामांना बसला आहे. विशेषत: मेट्रो आणि पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सुरू असलेल्या गृहप्रकल्पांना याची सर्वाधिक झळ बसली आहे. मजुरांअभावी ही कामे रखडली आहेत.
-डॉ. संजय मुखर्जी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको