पुरंदर विमानतळाच्या एसव्हीपीमध्ये सिडकोचे २०४० कोटींचे समभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 06:08 IST2019-07-12T06:08:37+5:302019-07-12T06:08:41+5:30
अध्यक्षपदी लोकेश चंद्र; महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची ७६० कोटींची गुंतवणूक

पुरंदर विमानतळाच्या एसव्हीपीमध्ये सिडकोचे २०४० कोटींचे समभाग
नवी मुंबई : पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथे प्रस्तावित असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विशेष हेतू कंपनी (एसव्हीपी) मध्ये सिडको २०४० कोटी रु पयांची गुंतवणूक करणार आहे.
२५ कोटी ५० हजार रुपयांची प्राथमिक गुंतवणूक करण्यास सिडको संचालक मंडळाने मंजुरी दिली असून, या प्रकल्पामध्ये महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची ७६० कोटींची गुंतवणूक असणार आहे. एसव्हीपीच्या अध्यक्षपदी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळ विकसित करण्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अखत्यारीतील महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे सोपविण्यात आली आहे. राज्यातील सर्व विमानतळांसाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुरंदर येथील विमानतळाच्या विकासासाठी विशेष हेतू कंपनीच्या स्थापनेसही मान्यता देण्यात आली आहे.
प्रस्तावित विशेष हेतू कंपनीमध्ये सिडकोचे सर्वाधिक म्हणजे ५१ टक्के समभाग ठेवण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. त्या खालोखाल महाराष्ट्र विकास कंपनीचे १९ टक्के एमआयडीसी व पीएमआरडीए यांचे अनुक्र मे १५ टक्के असणार आहे.
सदर विशेष हेतू कंपनीच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष म्हणून सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक चंद्र यांची नियुक्ती करण्यात आली असून, अध्यक्षांसह एकूण १४ सदस्य संचालक मंडळात असणार आहेत. सदर विमानतळासाठी जमीन संपादन, नुकसानभरपाई व पुनर्वसन या बाबींची जबाबदारी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे असणार आहे.
या प्रकल्पामध्ये महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची ७६० कोटी इतकी गुंतवणूक असणार आहे, तर ५१ टक्के समभागानुसार सिडकोची एकूण गुंतवणूक सुमारे २०४० कोटी रु पये इतकी अंदाजित आहे.
त्यापैकी २५ कोटी ५० हजार रु पयांची गुंतवणूक विशेष हेतू कंपनीची स्थापना झाल्यापासून ३० दिवसांच्या आत करायची असून उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. विशेष हेतू कंपनीकरिता सिडकोच्या वतीने करण्यात येणारी गुंतवणूक, करार, निविदा, दस्तावेज, कागदपत्रे, हमिपत्र, अर्ज इत्यादी बाबतचे सर्व अधिकार सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना असणार आहेत.