नवी मुंबई : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नवीन गृहयोजना जाहीर करण्याच्या दृष्टीने सिडकोने चाचपणी सुरू केली आहे. यात विविध विभागांतील शिल्लक घरांसह १२००० घरांचा समावेश असेल, असा अंदाज संबंधित विभागातील सूत्रांनी व्यक्त केला आहे.
सिडकोने अलीकडेच २६ हजार घरांची योजना राबविली. मात्र या घरांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. या घरांच्या किमती अधिक असल्याची ग्राहकांची ओरड आहे.
केवळ १८००० ग्राहकांनी या योजनेला प्रतिसाद दिला. त्यामुळे या योजनेतील तब्बल ७ हजार घरे शिल्लक आहेत. यातील सर्वाधिक घरे तळोजा नोडमधील आहेत. तसेच यापूर्वीच्या गृहयोजनेतीलसुद्धा अनेक घरे विविध कारणांमुळे विक्रीविना पडून आहेत.
या सर्व शिल्लक घरांच्या समावेशासह नवीन १२००० घरांची योजना अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जाहीर करण्याचा निर्णय सिडकोने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.