कामोठेतील अतिक्रमणावर सिडकोचा हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 01:24 IST2019-06-07T01:24:02+5:302019-06-07T01:24:20+5:30
ढाबा, झोपड्या व चाळी जमीनदोस्त : मोहीम आणखी तीव्र करणार

कामोठेतील अतिक्रमणावर सिडकोचा हातोडा
कळंबोली : कामोठे व मोठा खांदा गावात सिडकोने गुरुवारी अतिक्रमणविरोधी मोहीम राबवली. यामध्ये अनधिकृत ढाबा, झोपडपट्टी, चाळी, गाळ्यांवर कारवाई करण्यात आली. मोहिमेत अडथळा येऊ नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यापुढेही मोहीम तीव्र करण्यात येणार असल्याचे सिडकोकडून सांगण्यात आले.
बांधकाम नियंत्रक विशाल ढगे यांच्या नेतृत्वाखाली, सहायक नियंत्रक अमोल देशमुख, विनोद भुसावळे यांच्यासह १५ कामगार, एक जेसीबी, एक पोकलेनद्वारे सकाळी १० वाजता कारवाईला सुरुवात झाली. सेक्टर-३६ येथील शिवसेना शाखेच्या पाठीमागील अतिक्रमणात असलेल्या बेकायदेशीर ढाब्यावर हातोडा मारण्यात आला. त्याचबरोबर बाजूला असलेल्या टपऱ्यावरही कारवाई करण्यात आली.
मानसरोवर रेल्वेस्थानक रस्त्यावरील सेक्टर ३३ येथील झोपड्या तोडण्यात आल्या. दुपारनंतर मोठा खांदा गावालगत सेक्टर १७ येथील १६ रूम असलेली चाळ व चार गाळे जमीनदोस्त करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून सिडकोकडून अतिक्रमणविरोधी मोहीम तीव्र करण्यात आली आहे.
शिवसेना शाखेवर कारवाई झाली नाही
सिडको अतिक्रमण मोहिमेत सेक्टर ३६ येथील शिवसेना शाखा तोडण्यात येणार होती. या कारवाईच्या वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, विधानसभा संघटक दीपक निकम, राकेश गोवारी यांच्यासह शिवसैनिकांनी या कारवाईला विरोध दर्शवला.