शॉक लागून बालकामगाराचा मृत्यू, रबाळे एमआयडीसी मधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 21:54 IST2021-05-08T21:50:58+5:302021-05-08T21:54:06+5:30
आई व मोठ्या बहिणीला आधार देण्यासाठी तो कामाला जात होता. त्याच्या अपघाती निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

शॉक लागून बालकामगाराचा मृत्यू, रबाळे एमआयडीसी मधील घटना
- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई - विजेचा शॉक लागून बालकामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रबाळे एमआयडीसी मधील मॅचव्हील सिंडिकेट कंपनीत हा प्रकार घडला आहे. आई व मोठ्या बहिणीला आधार देण्यासाठी तो कामाला जात होता. त्याच्या अपघाती निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाच, प्रकरण दडपण्यासाठी कुटुंबावर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला.
अंश राजभर (१३) असे दुर्घटनेत मृत पावलेल्या मुलाचे नाव आहे. तो कोपर खैरणे सेक्टर १ येथे आई व मोठ्या बहिणीसोबत भाड्याच्या घरात राहायला होता. महापालिकेत सातवी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर तो मागील दोन वर्षांपासून मिळेल ते काम करून कुटुंबाला हातभार लावत होता. वडील कुटुंबापासून वेगळे झाल्यानंतर आई व मोठ्या बहिणीच्या सुखासाठी तो झटत होता. अशात नुकतेच तो रबाळे एमआयडीसी मधील मॅचव्हील सिंडिकेट या कंपनीत ठेकेदारामार्फत कामाला लागला होता. शुक्रवारी सकाळी तो नेहमी प्रमाणे रात्रपाळी संपवून घरी जायची तयारी करत असतानाच विजेचा शॉक लागला. यावेळी त्याला वाशीतील पालिका रुग्णालयात नेण्यात आले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यामुळे त्याच्या आई व बहिणीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कंपनीच्या निष्काळजी मुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मात्र तो बालकामगार असतानाही कागदोपत्री वय वाढवून त्याला नोकरीला ठेवण्यात आले होते. त्यामुळे ठेकेदारासह कंपनी पुढे कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या आहेत. परिणामी हे प्रकरण दडपण्याच्या प्रयत्नात राजभर कुटुंबाची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न झाला. मात्र दोषींवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर कुटुंब ठाम राहिल्याने त्यांचा प्रयत्न फसला.
अर्थकारणासाठी परिवाराची दिशाभूल
अंशच्या अपघाती मृत्यूला संधी समजून एका राजकीय व्यक्तीने अर्थकारण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. कंपनी विरोधातली तक्रार टाळण्यासाठी कुटुंबाला चार लाखाचे आमिष दाखवण्याचा प्रयत्न झाला. शिवाय रबाळे एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतली घटना असतानाही, कोपर खैरणेत पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु दोषींवर गुन्हा दाखल करण्याच्या निर्णयावर कुटुंब ठाम राहिल्याने त्याचा प्रयत्न फसला.
राजभर कुटुंबाने रबाळे एमआयडीसी पोलीसांकडे तक्रार करून देखील एका अधिकाऱ्याकडून चालढकल सुरु होती. या अधिकाऱ्याने मृतदेहाच्या शवविच्छेदन दरम्यान शनिवारी वाशीतील रुग्णालयात देखील जाऊन प्रत्यक्षदर्शी सोबत अरेरावीची भाषा वापरत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. अखेर संबंधितांनी वरिष्ठ निरीक्षक नितीन गीते यांना संपूर्ण घटनेबाबत कळवले. त्यानुसार शनिवारी संध्याकाळी गीते यांनी परिवाराची भेट घेऊन त्यांना कारवाईचे आश्वासन दिले.