नेरुळमधील रस्त्यांना गॅरेजचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 00:52 IST2018-12-14T00:52:16+5:302018-12-14T00:52:26+5:30
नेरुळ विभागातील अनेक पदपथ आणि रस्त्यावर बेकायदा गॅरेज सुरू असल्याने वाहतूककोंडीची समस्या उद्भवत आहेत.

नेरुळमधील रस्त्यांना गॅरेजचा विळखा
नवी मुंबई : नेरुळ विभागातील अनेक पदपथ आणि रस्त्यावर बेकायदा गॅरेज सुरू असल्याने वाहतूककोंडीची समस्या उद्भवत आहेत. पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांना देखील ये-जा करताना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.
नेरु ळमधील एल.पी. जंक्शन या रस्त्याच्या शेजारीच असलेल्या डॉ.डी.वाय. पाटील विद्यापीठासमोर पेट्रोल पंपाच्या शेजारील शॉपिंग सेंटरमध्ये चारचाकी वाहनांचे गॅरेजची दुकाने आहेत. शिरवणे गावातील अंतर्गत रस्त्यांवरदेखील मोठ्या प्रमाणावर गॅरेज थाटण्यात आले आहेत. गॅरेज असलेल्या दुकानांसमोरील रस्त्यावर दुचाकी, रिक्षा, चारचाकी वाहने दुरुस्ती, रेडियम, पेंटिंग, टायर आदी कामे केली जात असल्याने वाहने पदपथ आणि रस्त्याच्या कडेला बेकायदेशीररीत्या उभी केली जात आहेत.
नेरुळ सेक्टर-६ येथील पामबीच मार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावरदेखील गॅरेज थाटण्यात आली आहेत. या रस्त्यावरून नागरिकांची आणि वाहनांची देखील मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. तसेच शाळा, कॉलेज आणि कामानिमित्त ये-जा करणारे नागरिकदेखील मोठ्या प्रमाणावर ये-जा करतात. अनेक ठिकाणी गॅरेज असलेल्या दुकानासमोरील जागेमध्ये गॅरेजवाल्यांनी विविध साहित्य ठेवले असून पदपथाचा वापरही साहित्य ठेवण्यासाठी केला जात आहे. नागरिकांना पदपथावरून चालणे जिकिरीचे झाले आहे.