स्वस्त घरे पडली महागात

By Admin | Updated: March 18, 2016 00:21 IST2016-03-18T00:21:20+5:302016-03-18T00:21:20+5:30

पनवेल परिसरात स्वस्त घरांच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या ठकसेनांचे प्रमाण वाढले आहे. गत काही महिन्यांमध्ये तब्बल २२ गुन्हे दाखल झाले असून, ६५० नागरिकांचे २५ कोटी १६ लाख रुपये

Cheap houses fell in the expensive | स्वस्त घरे पडली महागात

स्वस्त घरे पडली महागात

- नामदेव मोरे, नवी मुंबई

पनवेल परिसरात स्वस्त घरांच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या ठकसेनांचे प्रमाण वाढले आहे. गत काही महिन्यांमध्ये तब्बल २२ गुन्हे दाखल झाले असून, ६५० नागरिकांचे २५ कोटी १६ लाख रुपये लुबाडले आहेत. यामधील सर्वाधिक १४ गुन्हे कामोठे व खांदेश्वर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये घडले आहेत.
मुंबई, नवी मुंबईमधील घरांचे भाव गगनाला भिडले आहेत. या परिसरातील घरे सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेली आहेत. स्वस्त घरांसाठी पनवेल हा एकच पर्याय नागरिकांना दिसू लागला आहे. मागील काही वर्षांत कामोठे, खांदेश्वर, नवीन पनवेल व तळोजा पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये शेकडो इमारतींचे बांधकाम सुरू झाले आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बिल्डर मोठे होर्डिंग लावू लागले आहेत. या होर्डिंगबाजीला भुलून नागरिक मोठ्या प्रमाणात घरासाठीची गुंतवणूक करत आहेत. अनेकांनी मुंबईतील झोपडपट्टीतील घरे विकली, गावाकडील जमीन विकली, दागिने गहाण ठेवून पैसे उभे केले आहेत. स्वत:च्या मालकीचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या यामधील हजारो नागरिकांना तोतया बिल्डर फसवून पोबारा होवू लागले आहेत. बिल्डरवर विश्वास ठेवणाऱ्यांना घर मिळतच नाही पण गुंतविलेले पैसेही मिळत नाहीत. वारंवार बिल्डरांच्या कार्यालयात चकरा मारून दमलेले नागरिक पोलीस स्टेशनमध्ये जावून गुन्हे नोंदवू लागले आहेत.
सर्वसामान्य नागरिकांना फसविणाऱ्यांवर कडक कारवाई करणे व भविष्यात अशाप्रकारच्या घटना होवू नये यासाठी उपाययोजना करण्याचे आव्हान पोलीस व इतर शासकीय यंत्रणांसमोर उभे राहिले आहे. परिमंडळ दोनमधील चार पोलीस स्टेशनमध्ये गत काही महिन्यांमध्ये तब्बल २२ गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये खांदेश्वरमध्ये सर्वाधिक २२, कामोठेमध्ये दोन, उरण व नवीन पनवेलमध्ये प्रत्येकी तीन व तळोजामध्ये एक गुन्हा दाखल झाला आहे. आतापर्यंत ६५० नागरिकांनी त्यांची फसवणूक झाली असल्याची तक्रार पोलिसांकडे दिली असून बिल्डर गुंतवणूकदारांचे २५ कोटी १६ लाख रुपये घेवून पसार झाले आहेत. यामध्ये २० बांधकाम कंपनीचे मालक व संचालकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. गुन्हे दाखल न झालेल्याही शेकडो नागरिकांची फसवणूक झाली आहे. परंतु अनेकांनी तक्रारी करण्यापेक्षा बिल्डरांकडून पैसे मिळविण्यासाठी त्यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला आहे. अनेक बिल्डरांनी त्यांची कार्यालये बंद करून गाशा गुंडाळला आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात बिल्डरांकडे काम करणाऱ्यांनी याठिकाणी स्वत: बिल्डर होण्याचा प्रयत्न केला आहे. नागरिकांना घर देता येत नाही व पैसेही परत करता येत नाहीत असे लक्षात आले की बिल्डर पळ काढत आहेत.

अंगठेबहाद्दरही बनले बिल्डर
कोणत्याही कंपनीत शिपायाची नोकरी करायची असली तरी शैक्षणिक पात्रता लागते, परंतु बिल्डर होण्यासाठी मात्र काहीच शैक्षणिक पात्रता लागत नाही. कामोठे व खांदेश्वर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये गाळे भाड्याने घेवून त्यावर बिल्डर असल्याचा बोर्ड लावला असून आकर्षक व्हिजीटिंग तयार करून कार्यालये थाटली आहेत. स्वस्त दरात घर देण्याचे मोठे होर्डिंग लावून नागरिकांची फसवणूक सुरू आहे. यामुळे या परिसरातील प्रामाणिकपणे बांधकाम व्यवसाय करणाऱ्यांची प्रतिमाही खराब होत आहे. यामुळे बोगस बिल्डरांचाही शोध घेवून कारवाई करण्याची वेळ आली आहे.

पोलिसांनी तयार केला अ‍ॅक्शन प्लॅन
पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यांच्या तपासाचा साप्ताहिक आढावा घेतला जात आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बांधकामांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
विनापरवाना बांधकाम सुरू असेल किंवा एखादा बिल्डर फसवणूक करत असल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ पोलिसांना कळविण्याचे आवाहन केले आहे.
फसवणूक झालेल्या नागरिकांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. बिल्डरने नागरिकांचे पैसे कुठे गुंतविले, त्याची इतर मालमत्ता काय आहे हेही तपासले जात आहे.

फसवणुकीची उदाहरणे
- नेरेमधील सुधीर पाटील व इतर काही जणांनी नेरे पाडामधील एका प्रकल्पामध्ये गुंतवणूक केली होती. जून २०१२ ते फेब्रुवारी २०१६ दरम्यान या सर्वांनी बिल्डरला ६१ लाख २८ हजार रुपये दिले होते. परंतु बिल्डरने घरे न देताच फसवणूक केली आहे.
- गोवंडीमध्ये राहणाऱ्या ज्ञानेश्वर रणवरे व इतर नागरिकांनी पनवेलजवळील एका प्रकल्पामध्ये घर घेण्यासाठी पैसे गुंतविले होते. जानेवारी २०१२ ला पैसे दिल्यानंतर २५ फेब्रुवारी २०१६ पर्यंत घर बांधून दिले नाही व पैसेही परत न केल्याने बिल्डरविरोधात ३४ लाख ७७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
- पनवेलजवळील सुकापूरमध्ये राहणारे गणेश कोंडीबा यळकर या रिक्षाचालकाने व इतर अनेक नागरिकांनी चिपळे गावच्या हद्दीमध्ये घर घेण्यासाठी गुंतवणूक केली होती. बिल्डरला जानेवारी २०१३ ते फेब्रुवारी २०१६ च्या दरम्यान २० लाख ८५ हजार रुपये दिले होते. परंतु बिल्डरने इमारतीचे बांधकाम न करता सर्वांची फसवणूक केली आहे.
- नेहा नंदकुमार पेडणेकर या महिलेने विचुंबेत घर विकत घेण्यासाठी ३ लाख ८२ हजार रुपये गुंतविले होते. जानेवारी २०११ मध्ये त्यांनी पैसे दिले. बिल्डर वारंवार पाठपुरावा करूनही घर देत नाही व घेतलेले पैसेही परत करत नसल्याने त्यांनी खांदेश्वर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

नागरिकांनी घर खरेदीसाठी गुंतवणूक करताना संबंधित बिल्डर व त्याच्या प्रोजेक्टविषयी सविस्तर माहिती घ्यावी. या परिसरात बांधकाम व्यवसाय तेजीत असून नागरिकांची फसवणूक झाल्याचे गुन्हे विविध पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत. या गुन्ह्यांमधील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी व नागरिकांचे पैसे परत मिळावे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
- विश्वास पांढरे,
पोलीस उपायुक्त, परिमंडळ २

Web Title: Cheap houses fell in the expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.