आत्मदहन करण्यापूर्वीच चव्हाण पोलिसांच्या ताब्यात
By Admin | Updated: May 30, 2017 06:09 IST2017-05-30T06:09:59+5:302017-05-30T06:09:59+5:30
औद्योगिक विकास महामंडळाने शाळेचा पाणीपुरवठा बेकायदा तोडल्याचा आरोप करीत आत्मदहन करण्यासाठी निघालेल्या

आत्मदहन करण्यापूर्वीच चव्हाण पोलिसांच्या ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
महाड : औद्योगिक विकास महामंडळाने शाळेचा पाणीपुरवठा बेकायदा तोडल्याचा आरोप करीत आत्मदहन करण्यासाठी निघालेल्या कुमुदिनी चव्हाण यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
कुमुदिनी चव्हाण या चोचिंदे येथे कोकण विकास प्रबोधिनी या संस्थेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल या शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत. या शाळेला औद्योगिक विकास महामंडळाकडून करण्यात आलेला पाणीपुरवठा अन्यायकारक आणि बेकायदा तोडण्यात आल्याचा आरोप चव्हाण यांनी केला असून त्याच्या निषेधार्थ सोमवारी त्या महाड प्रांत कार्यालयासमोर आत्मदहन करणार होत्या. सकाळी त्या आपल्या चोचिंदे येथील निवासस्थानापासून पदयात्रेने महाड शहराकडे येण्यास निघाल्या. पोलिसांनी दादली येथे त्यांना ताब्यात घेऊन महाड शहर पोलीस ठाण्यात आणले. या प्रकरणी कुमुदिनी चव्हाण यांच्याविरोधात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अन्य सहा जणांविरोधात जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.