फिफा सामन्यांदरम्यान वाहनतळाचे आव्हान, पोलिसांसह पालिकेची कसोटी : स्टेडियमपर्यंत विशेष बससेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 03:25 IST2017-09-08T03:24:57+5:302017-09-08T03:25:03+5:30
१७ वर्षांखालील फिफा विश्वचषकाचे ८ सामने नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणार आहेत. मॅचेस पाहण्यासाठी आलेल्या क्रीडा रसिकांना वाहनतळ उपलब्ध करून देण्याचे आव्हान महापालिका व पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

फिफा सामन्यांदरम्यान वाहनतळाचे आव्हान, पोलिसांसह पालिकेची कसोटी : स्टेडियमपर्यंत विशेष बससेवा
नामदेव मोरे
नवी मुंबई : १७ वर्षांखालील फिफा विश्वचषकाचे ८ सामने नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणार आहेत. मॅचेस पाहण्यासाठी आलेल्या क्रीडा रसिकांना वाहनतळ उपलब्ध करून देण्याचे आव्हान महापालिका व पोलिसांसमोर उभे राहिले आहे. दोन्ही यंत्रणांनी त्यासाठी जय्यत तयारी सुरू केली असून नेरूळ, सीवूडसह खारघर परिसरामध्ये वाहनतळ उभारण्याचे निश्चित करण्यात आले आहे. वाहनतळापासून स्टेडियमपर्यंत विशेष बससेवा सुरू करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
फिफा विश्वचषक स्पर्धेचे सामने नवी मुंबईमध्ये होणार असून त्यानिमित्ताने विश्वभर शहराचा नावलौकिक होणार आहे. फुटबॉल सामने यशस्वीपणे पार पाडण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका, पोलीस, डॉ. डी. वाय. पाटील समूह यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यास सुरवात केली आहे. राज्य शासनानेही सहकार्य करण्यास सुरवात केली आहे. ६ दिवसांमध्ये विश्वचषकाचे ८ सामने येथे होणार आहेत. डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये ४५ हजार प्रेक्षक बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय सुरक्षा, स्टेडियम व्यवस्थापन व इतर कर्मचारी धरून ५० हजारपेक्षा जास्त नागरिक प्रत्यक्ष मैदानामध्ये उपस्थित राहणार आहेत. देशाच्या कानाकोपºयातून येणाºया क्रीडाप्रेमींची खासगी वाहने कुठे उभी करायची हा सर्वात गंभीर प्रश्न स्टेडियम व्यवस्थापन, महापालिका व वाहतूक पोलिसांसमोर असणार आहे. सायन - पनवेल महामार्गाला लागून स्टेडियम आहे. वाशी ते पनवेल दरम्यान नेरूळ मध्यवर्ती ठिकाणी आहे. महामार्गावरून येणारी नियमित वाहने व त्या दिवशी स्पर्धेसाठी येणारी वाहने यांचे योग्य नियोजन केले नाही तर वाहतुकीचा बोजवारा उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्टेडियम परिसरामध्ये फक्त व्हीआयपी वाहनेच उभी करता येणार आहेत.
वाहनतळाचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिका व पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. मैदानापासून काही अंतरावर रहेजा उद्योग समूहाचा विस्तीर्ण भूखंड आहे. त्या भूखंडावर विशेष वाहनतळ उभारण्यात येणार असून २ हजारपेक्षा जास्त वाहने तेथे उभी करता येणार आहेत. याशिवाय नेरूळ सेक्टर ६ मधील श्री गणेश रामलीला मैदान, सीवूडमधील गणपतशेठ तांडेल मैदान, सीवूड ग्रँड मॉल व रेल्वे स्टेशनमधील वाहनतळावरही वाहने उभी करण्याची सोय करण्यात येणार आहे. उरण फाट्याजवळ हायटेंशनखालील विस्तीर्ण भूखंड सिडकोकडून वाहनतळासाठी मिळविण्यात आले आहेत. त्या भूखंडावरही वाहने मोठ्याप्रमाणात उभी करता येणार आहेत. याशिवाय पुणे व कोकणातून येणाºया क्रीडाप्रेमींची वाहने खारघरमध्ये सेंट्रल पार्क मैदानामध्ये उभी करता येतील का याविषयी चाचपणी सुरू झाली आहे. वाहनतळापासून स्टेडियमपर्यंत एनएमएमटी बसेस सुरू ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी दोन्ही यंत्रणांच्या वारंवार बैठका सुरू असून कोणत्याही स्थितीमध्ये क्रीडाप्रेमींची गैरसोय होवू नये यासाठी काळजी घेण्यास सुरवात केली आहे.