मुख्यालयातील सीसीटीव्ही नियंत्रण आयुक्तांकडे
By Admin | Updated: March 23, 2017 01:43 IST2017-03-23T01:43:01+5:302017-03-23T01:43:01+5:30
महासभा सुरू असताना सभागृहातील घडामोडींचे थेट प्रक्षेपण आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या दालनात चालत असल्याचा आरोप

मुख्यालयातील सीसीटीव्ही नियंत्रण आयुक्तांकडे
नवी मुंबई : महासभा सुरू असताना सभागृहातील घडामोडींचे थेट प्रक्षेपण आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या दालनात चालत असल्याचा आरोप सभागृहनेते जयवंत सुतार यांनी केला. सभागृहात कोण आपल्याविषयी वाईट बोलतेय, हे पाहण्याचे काम आयुक्त करत असल्याचाही आरोप त्यांनी केला. यासंदर्भात शहर अभियंता मोहन डगावकर यांनी संपूर्ण मुख्यालयातील सीसीटीव्हीचा कंट्रोलरूम आयुक्तांच्यात दालनात असल्याचे सांगताच, नगरसेवकांचा पारा अधिकच चढला.
मंगळवारी सुरू असलेल्या महासभेदरम्यान आयुक्त तुकाराम मुंढे सभागृहात उपस्थित नव्हते; परंतु दालनात बसून ते सभागृहातील थेट प्रक्षेपण पाहत असल्याचा आरोप सभागृहनेते जयवंत सुतार यांनी केला. हा आरोप गंभीर असल्याचे सांगत महापौर सुधाकर सोनवणे यांनी शहर अभियंत्यांकडे यासंबंधीची चौकशी केली. या वेळी मोहन डगावकर यांनी मुख्यालयातील सर्वच सीसीटीव्हीचे कंट्रोलरूम आयुक्तांच्या दालनात असल्याचे सांगितले. यावरून सभागृहात उपस्थित नगरसेवकांचा पारा अधिकच चढला. जे नगरसेवक आयुक्तांविरोधात सभागृहात वक्तव्य करतात, त्यांनाच कारवाईच्या माध्यमातून लक्ष्य केले जात असल्याचा आरोप यापूर्वी अनेकदा नगरसेवक नामदेव भगत यांनी केलेला आहे. त्यामुळे सुतार यांनी सभागृहापुढे उघड केलेल्या प्रकाराचे गांभीर्य इतरही नगरसेवकांनी व्यक्त केले; परंतु महासभेचे थेट प्रक्षेपण महापौर दालनात आठ महिन्यांपूर्वीच बंद करण्यात आले असताना, फक्त आयुक्तांच्या दालनात ते कसे सुरू? असा प्रश्न महापौर सुधाकर सोनवणे यांनी उपस्थित केला. तसेच दुसऱ्यांच्या दालनात काय चालले आहे, हे डोकावून पाहण्याची सवय आयुक्तांना जडली असल्याचाही टोला त्यांनी मारला. याचा वापर फक्त इतरांना अडचणीत आणण्यासाठीच केला जात असल्याचे सांगत, मागील काही महिन्यांपासून महापालिकेत पोरखेळ सुरू असल्याचीही टीका त्यांनी केली. (प्रतिनिधी)