गुजरातमधील ‘वसंतोत्सव’मध्ये गाजले ‘कैपतनृत्य’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 00:18 IST2020-03-02T00:18:04+5:302020-03-02T00:18:13+5:30

गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये नुकताच ‘वसंतोत्सव’ हा सांस्कृतिक महोत्सव पार पडला

'Captive Dance' performed at 'Spring Festival' in Gujarat | गुजरातमधील ‘वसंतोत्सव’मध्ये गाजले ‘कैपतनृत्य’

गुजरातमधील ‘वसंतोत्सव’मध्ये गाजले ‘कैपतनृत्य’

नवी मुंबई : गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये नुकताच ‘वसंतोत्सव’ हा सांस्कृतिक महोत्सव पार पडला असून त्यामध्ये मुंबई, नवी मुंबई परिसरातील ‘कैपतनृत्य’ ही लोककला चांगलीच गाजली. गुजरात राज्य सांस्कृतिक विभागाच्या वतीने पार पडलेल्या या उत्सवामध्ये देशभरातील राज्यांतील लोककला सादर करण्यात आल्या.
गुजरातचा क्रीडा व सांस्कृतिक विभाग आणि क्षेत्रीय सांस्कृतिक केंद्र उदयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या वसंतोत्सवाचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. २५ फेब्रुवारी ते ५ मार्चदरम्यान सुरू असलेल्या लोककला महोत्सवामध्ये मुंबईच्या ‘कैपतनृत्य’ने वाहवा मिळविली. यापूर्वी २००८ मध्ये पार पडलेल्या वसंतोत्सवामध्येही हे नृत्य सादर करण्यात आले होते.
‘कैपतनृत्य’ म्हणजे ‘गजनृत्य’. ही लोककला गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई, नवी मुंबई परिसरात जपली जात असून विदेशातही गेली होती. तशी ही लोककला मूळची आरेवाडी (जि. सांगली) येथील असून, दैवत बिरोबाच्या भक्ती आणि सेवेसाठी सादर केली जाते. यामध्ये ढोल, कैताळ व बासरी या वाद्यांसह नृत्य करणारे रंगबिरंगी कपड्यांसह फेटा बांधून पारंपरिक नृत्य सादर करतात.
गुजरातधील गांधीनगर येथील संस्कृतीकुंज या निसर्गरम्य ठिकाणी हा महोत्सव पार पडला. याप्रसंगी महाराष्टÑातील कैपतनृत्यासह पंजाब, हरियाणा, गुजरात, राजस्थान, आसाम, बिहार, छत्तीसगड आदी राज्यातील विविध लोककला सादर करण्यात आल्याचे विकास कोळेकर यांनी सांगितले. ढोलाच्या तालावर सादर करण्यात आलेल्या ‘कैपतनृत्या’ने गुजरातवासीयांची मने जिंकली.
।विविध मान्यवरांसमोर
सादर झाली लोकनृत्यकला
कैपतनृत्याला शेकडो वर्षांची परंपरा असून रिमिक्सच्या जमान्यातही हे पारंपरिक नृत्य जपले जात आहे. हे लोकनृत्य २००१ मध्ये इग्लंड व २००९ मध्ये रशियामध्ये सादर करण्यात आले आहे. देशभरात पार पडलेल्या विविध लोककला महोत्सवप्रसंगी ही लोककला सादर करण्यात आली आहे. देशाचे पंतप्रधान पं. नेहरू, राजीव गांधी, अटलबिहारी वाजपेयी व नरेंद्र मोदी या महोदयांनी पाहिली आहे. तसेच राष्टÑपती शंकर दयाळ शर्मा, ए. पी. जे. अब्दुल कलाम व प्रतिभा पाटील आदी राष्टÑपती महोदयांनीही या कलेचा आस्वाद घेतला आहे.

Web Title: 'Captive Dance' performed at 'Spring Festival' in Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.