नवी मुंबईतील बस स्टॉप बनले भिकाऱ्यांचे आश्रयस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 00:28 IST2019-09-25T00:28:02+5:302019-09-25T00:28:14+5:30
प्रशासनाचे दुर्लक्ष; पालिका आयुक्त निवासासमोरील प्रकार

नवी मुंबईतील बस स्टॉप बनले भिकाऱ्यांचे आश्रयस्थान
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाचे बस स्टॉप भिकाऱ्यांच्या आश्रयाचे ठिकाण बनले असून यामुळे स्टॉपवर बसची प्रतीक्षा करणाºया प्रवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे महापालिका आयुक्त निवासस्थानासमोरील बस स्टॉपवर भिकाºयांनी संसार मांडला असून याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या माध्यमातून शहरातील प्रवाशांना सुविधा देण्याच्या दृष्टीने विविध सुविधा देण्यात येत आहेत. बसची प्रतीक्षा करणाºया प्रवाशांचे ऊन आणि पावसापासून संरक्षण व्हावे तसेच बसण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने बस थांबा शेड बसविण्यात आले आहेत.
परंतु शहरातील अनेक बस थांब्यांचा गैरवापर होत असून याचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील काही ठिकाणचे बस थांबा शेड मद्यपींच्या बसण्याचे व झोपण्याचे ठिकाण झाले आहेत तर काही बस थांब्यांवर फेरीवाले व्यवसाय करीत आहेत. महापालिका आयुक्त यांच्या नेरूळ येथील निवासासमोरील बस थांबा शेडवर भिकाºयांनी संसार थाटला आहे. प्रशासनाचे याकडेदेखील दुर्लक्ष झाले असून प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.