अर्थसंकल्पावरील चर्चेत अपेक्षांचे ओझे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 00:58 IST2018-03-28T00:58:24+5:302018-03-28T00:58:24+5:30
अर्थसंकल्पावर चर्चा करत असताना गतवर्षी तरतूद असूनही कामे झाली नसल्याबद्दल सर्वपक्षीय नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली

अर्थसंकल्पावरील चर्चेत अपेक्षांचे ओझे
नवी मुंबई : अर्थसंकल्पावर चर्चा करत असताना गतवर्षी तरतूद असूनही कामे झाली नसल्याबद्दल सर्वपक्षीय नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. पाठपुरावा करूनही विकासकामे केली जात नाहीत. आरोग्य सुविधा चांगली मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करतानाच पुढील वर्षासाठी प्रत्येक प्रभागामध्ये कोणती विकासकामे झाली पाहिजेत, याची यादीच सभागृहात सादर करण्यात आली.
सर्वसाधारण सभेमध्ये अर्थसंकल्पावरील चर्चेच्या दुसऱ्या दिवशी सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रभागनिहाय कोणती कामे झाली पाहिजेत, याची माहिती दिली. आरोग्य सुविधा चांगली मिळत नसल्याविषयी नाराजी व्यक्त केली. आरोग्य विभागातील मरगळ दूर झाली पाहिजे. पालिका शाळेतील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे. गतवर्षी अर्थसंकल्पामध्ये तरतूद असताना महिला व बालकल्याण विभागाच्या योजना योग्य पद्धतीने राबविण्यात आल्या नाहीत. तरतूद केलेला निधी खर्च होऊ शकला नाही. शिक्षणासाठीचा निधी खर्च झालेला नाही. अनेक कामांसाठी तरतूद केली; परंतु प्रत्यक्षात ते प्रकल्प सुरूही झाले नाहीत. अर्थसंकल्पात तरतूद करून कामे होत नाहीत व दुसरीकडे कोट्यवधी रुपये खर्चही होत आहेत. मग नक्की कोणती कामे केली जातात हेच कळत नाही, अशा शब्दांत अनेकांनी नाराजी व्यक्त केली. आदिवासी नागरिकांसाठी घरकूल योजना राबविण्यात यावी. झोपडपट्टी परिसरामध्ये चांगल्या सुविधा देण्यात याव्यात, अशाप्रकारची मागणीही नगरसेवकांनी केली आहे. योजना व परवाना विभागाचे काम योग्य प्रकारे होत नाही. या विभागाचे कामकाज सुधारण्यासाठी ठोस कार्यवाही करण्याची गरज असल्याचे मतही अनेक नगरसेवकांनी व्यक्त केले.
मालमत्ता कराची थकबाकी ही गंभीर गोष्ट झाली आहे. या विभागातील सावळा गोंधळ संपत नाही. व्याज, चक्रवाढ व्याजाची रक्कम वाढल्याने मालमत्ता कर भरणे जवळपास अशक्य झाले आहे. अशा स्थितीमध्ये नागरिकांना दिलासा देण्यासाठी अभय योजना राबविण्यात यावी, अशा सूचना नगरसेवकांनी केल्या आहेत. शहरातील डेब्रिजची समस्याही गंभीर झाली आहे. डेब्रिज माफियांवर नियंत्रण मिळविण्याबरोबर डेब्रिजचा पुनर्वापर करण्यावर लक्ष देण्याची गरज असल्याचे मतही नगरसेवकांनी व्यक्त केले. शहरातील बचतगटांना प्रोत्साहन देण्याची मागणीही नगरसेवकांनी केली.
वसाहतीअंतर्गत कामासाठी १०० कोटींची तरतूद करा. वसाहतीअंतर्गत कामे केली नाहीत, तर आझाद मैदानावर उपोषण करू
- मनोज हळदणकर,
नगरसेवक, शिवसेना
आरोग्य विभागाच्या कामकाजाला मरगळ आली असून ती दूर करण्याची गरज आहे. मालमत्ता व एलबीटीच्या थकबाकी वसुलीसाठी जादा कर्मचारी नियुक्त करण्याची गरज आहे.
- संजू वाडे, नगरसेवक, शिवसेना
महापालिका व सामाजिक संस्था प्रत्येक वर्षी वृक्षारोपण करते; परंतु नंतर वृक्षांची काळजी घेतली जात नाही. वृक्ष लागवडीबरोबर संवर्धनावरही लक्ष दिले पाहिजे.
- सुरेखा नरबागे, प्रभाग-१०३
अडवली भुतावली गावामध्ये मलनि:सारण वाहिनी नाही. आदिवासींसाठी घरकूल योजना राबविण्याची गरज आहे. स्मशानभूमी व इतर समस्याही सोडविण्यात याव्यात.
- रमेश डोळे, प्रभाग-२६
गतवर्षी अर्थसंकल्पात तरतूद करूनही अनेक कामे झाली नाहीत. एमआयडीसीमधील नाल्यात दूषित पाणी सोडले असून, प्रदूषणाचा प्रश्न गंभीर झाला आहे.
- रामदास पवळे,
प्रभाग-४९
मालमत्ता कराच्या वसुलीसाठी अभय योजना राबविण्यात यावी. डेब्रिजची समस्या वाढत असून त्याचा पुनर्वापर करण्यात यावा.
- दमयंती आचरे, प्रभाग-४३
बचतगटांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. महिला व बालकल्याण विभागातील योजनांची योग्य अंमलबजावणी आवश्यक आहे.
- शिल्पा कांबळी, प्रभाग-८८
घणसोलीमध्ये नवीन रूग्णालय बांधण्याची गरज आहे. याशिवाय परिसरातील विकासकामे मार्गी लावण्यात यावीत.
- कमल पाटील,
नगरसेविका, शिवसेना
तुर्भे विभागात गार्डन उपलब्ध करून द्यावे. पत्रकार कक्षात सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. संवर्धनावरही लक्ष दिले पाहिजे.
- शशिकला भोलानाथ पाटील,
प्रभाग-७२
गावगवठाणात प्रवेशद्वार, कमानी उभारण्यात याव्यात. गवळीदेव, सुलाई देवी, अशा पर्यटनस्थळी सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
- मोनिका पाटील, प्रभाग-२८
खेळाडूंना सरावासाठी मैदान उपलब्ध करून द्याव्यात. क्रीडासंस्कृती जपण्यासाठी मैदानामध्ये आवश्यक त्या सुविधा पुरवा.
- चेतन नाईक, प्रभाग-२२
उद्यानांच्या कंपाउंडची दुरु स्ती करावी. कोपरखैरणे सेक्टर-२ येथील भूखंडावर दैनंदिन बाजार विकसित करावा. महापालिका शाळांचे काम लवकर पूर्ण करावे.
- मेघाली राऊत, प्रभाग-३८
गावगावठाण परिसरातील विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करावी.
- ज्ञानेश्वर सुतार,
प्रभाग-८९
प्रभागातील विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. वेळेत कामे पूर्ण केली जात नसून ती वेळेवर कशी पूर्ण होतील, याकडे लक्ष द्यावे.
- लीलाधर नाईक , प्रभाग-५०
डेब्रिजच्या भरारी पथकांत वाढ करावी, त्यामुळे डेब्रिजमाफियांना आळा बसेल. सी. सी. व ओ. सी.साठीची प्रक्रिया लवकर करावी.
- सलुजा सुतार, प्रभाग-९९
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व दि. बा. पाटील यांचे स्मारक उभारावे, यासाठी एक कोटींची तरतूद करावी. कोळी बांधवांना मासेमारीसाठी होडी विकत घेण्यासाठी ५० हजार ते एक लाख रुपये मदत करावी.
- सोमनाथ वास्कर, प्रभाग-७४
सकाळी काम करणारे सफाई कामगार पुन्हा दुपारी काम करतात. इतर पालिकांत दोन पाळ्यांत कामगार आहेत. त्यामुळे सफाई कामगारांची संख्या वाढवून दिवसपाळ्यांत ते करण्यात यावेत. त्यामुळे सफाई कामगारांवरचा भार कमी होईल.
- गिरीश म्हात्रे,
प्रभाग-९५
परवाना विभागाला पूर्ण वेळ उपायुक्त द्यावा, जेणेकरून पालिकेचे उत्पन्न वाढेल. खासगी दवाखान्यांचे नोंदणीशुल्क वाढवावे. महिलांसाठी कॅन्सर व संपूर्ण शारीरिक तपासणी शिबिर चालू करावे. पारसिक हिलवर सायंटिफिक म्युझियमकरिता ५० कोटी खर्चाची तरतूद करावी.
- सरोज पाटील, प्रभाग-१०१
पत्रकारांसाठी एक कोटींच्या पत्रकार आपत्कालीन निधीची तरतूद करावी. तलावातील गाळ काढण्यासाठी खर्च कमी करण्यासाठी मंडळांना इको फ्रेंडली मूर्ती देण्यात याव्यात, जेणेकरून दरवर्षी होणारा खर्च टाळता येईल.
- किशोर पाटकर, प्रभाग-६१
कुकशेत गावातील १६ भूखंड पालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत. ते विकसित करून नागरिकांच्या वापरासाठी खुले करावेत.
- सुजाता पाटील, प्रभाग-८५
महिलांना कापडी व कागदी पिशव्या तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांनी केलेल्या पिशव्या पालिकेनेच विकत घ्याव्यात, म्हणजे महिलांना रोजगार मिळेल.
- संगीता बोºहाडे, प्रभाग-७६