सीआरझेड क्षेत्रात गेट बसविण्याचा बिल्डरचा प्रयत्न हाणून पाडला; पर्यावरणप्रेमींची जागरूकता
By नारायण जाधव | Updated: May 11, 2024 16:09 IST2024-05-11T16:07:46+5:302024-05-11T16:09:29+5:30
वनविभागासह पाेलिसांची तत्परता.

सीआरझेड क्षेत्रात गेट बसविण्याचा बिल्डरचा प्रयत्न हाणून पाडला; पर्यावरणप्रेमींची जागरूकता
नारायण जाधव,नवी मुंबई : एनआरआय आणि डीपीएस तलावाच्या परिसरात सीआरझेड क्षेत्रात एका बिल्डरकडून अनधिकृतपणे लोखंडी गेट बसवून वाट अडविण्याचा प्रकार सुरू होता. मात्र, याबाबत पर्यावरणप्रेमींनी तक्रार करताच नवी मुंबई पोलिस, वनविभाग आणि सिडको अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन गेट बसविण्याचा बिल्डरचा प्रयत्न हाणून पाडला.
पाम रस्त्यावर मिस्त्री कन्स्ट्रक्शनकडून बांधकाम सुरू आहे. त्याला पर्यावरणप्रेमींनी विरोध केला आहे. यासंदर्भात त्यांची महापालिका, सिडकोसह न्यायालयीन लढाई सुरू आहे. असे असतानाही शनिवारी या परिसरात बिल्डरकडून अधिकृतपणे गेट बसविण्याचे काम सुरू होते. त्यासाठी लोखंडी गेट, सिमेंट मिक्सर आणले हाेते.
मात्र, हा परिसर वाचविण्यासाठी लढा देणारे पर्यावरणप्रेमी सुनील अगरवाल यांनी तत्काळ याबाबत सिडको, नवी मुंबई पोलिस, वनविभाग, महापालिकेकडे समाजमाध्यमांद्वारे तक्रार केली. तिची दखल घेऊन येथील गेट तत्काळ प्रभावाने हटविण्यात आले. यामुळे पर्यावरण ऱ्हासाचा मोठा अनर्थ टळला असून, पर्यावरणप्रेमींनी आनंद व्यक्त करून सिडको, नवी मुंबई पोलिस, वनविभाग, महापालिकेचे आभार मानले आहेत.