पनवेलमध्ये आढळला घाटकोपरच्या सोनाराचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 05:39 IST2018-12-08T05:39:01+5:302018-12-08T05:39:08+5:30

पनवेलमधील देहरंग धरणालगतच्या झाडीमध्ये अज्ञाताचा मृतदेह आढळला होता

 The body of Ghatkopar gold found in Panvel | पनवेलमध्ये आढळला घाटकोपरच्या सोनाराचा मृतदेह

पनवेलमध्ये आढळला घाटकोपरच्या सोनाराचा मृतदेह

पनवेल /मुंबई: पनवेलमधील देहरंग धरणालगतच्या झाडीमध्ये अज्ञाताचा मृतदेह आढळला होता. त्याची ओळख पटली असून, तो घाटकोपरच्या सोनाराचा असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यांचे अपहरण करून हत्या झाल्याचा संशय असून मुंबईसह नवी मुंबई पोलीस तपास करत आहेत.
राजेश्वर उदानी (५७) असे मृत व्यापाऱ्याचे नाव आहे. ते घाटकोपरचे असून त्यांचा सोन्याचा व्यवसाय आहे. २८ नोव्हेंबरपासून ते बेपत्ता असल्याने नातेवाइकांनी ते हरवल्याची तक्रार घाटकोपर पोलिसांकडे केली होती.
यादरम्यान तीन दिवसांपूर्वी देहरंग धरणालगतच्या जंगलात अज्ञात मृतदेह आढळला होता. मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटलेली नव्हती. अखेर उदानी यांच्या नातेवाइकांनी सदर मृतदेहाची पाहणी केली असता, तो राजेश्वर यांचाच मृतदेह असल्याची खात्री पटल्याचे पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक राजपूत यांनी सांगितले.
शवविच्छेदन अहवालात त्यांच्या शरीरावर कसलेही घाव आढळून आलेले नाहीत. परंतु उदानी यांचे अपहरण करून हत्या झाल्याचा त्यांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. त्यानुसार उदानी यांच्या कुटुंबीयांसह घाटकोपर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. अपहरणानंतर हत्या करून मृतदेह जंगलात टाकल्याचा संशय आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Web Title:  The body of Ghatkopar gold found in Panvel