नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ब्लास्टींगमुळे वहाळ गावातील घरांना हादरे, सुमारे १०० घरांना तडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2022 19:18 IST2022-11-05T19:17:58+5:302022-11-05T19:18:19+5:30

मधुकर ठाकूर  उरण : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सपाटीकरणाच्या कामासाठी दररोज मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या बोर ब्लास्टींगमुळे भुंकपासारखे हादरे बसत ...

blasting of Navi Mumbai International Airport shook the houses of Wahal village | नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ब्लास्टींगमुळे वहाळ गावातील घरांना हादरे, सुमारे १०० घरांना तडे

नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ब्लास्टींगमुळे वहाळ गावातील घरांना हादरे, सुमारे १०० घरांना तडे

मधुकर ठाकूर 

उरण : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सपाटीकरणाच्या कामासाठी दररोज मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या बोर ब्लास्टींगमुळे भुंकपासारखे हादरे बसत असल्याने वहाळ गावातील सुमारे १०० घरांना तडे गेले आहेत.यामुळे रहिवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून बोर ब्लास्टींग बंद न केल्यास विमानतळाचे कामकाज बंद करण्यासाठी ग्रामस्थांच्या माध्यमातून आंदोलन छेडण्याचा कडक इशारा वहाळ ग्रामपंचायतीने  सिडकोला दिला आहे. 

नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीसाठी सपाटीकरणाचे जोरदार काम सुरू आहे.डोंगर, टेकड्यांचे सपाटीकरण करण्यासाठी बोर ब्लास्टींगचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे.यासाठी नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाचे ठेकेदार अदानी इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपनीला पेट्रोलियम तथा विस्फोटक सुरक्षा विभागाने कंट्रोल ब्लॉस्ट करण्याच्या सूचनाही केल्या आहेत.मात्र दररोज दुपारच्या वेळी बोर ब्लास्टींग करताना शासनाचे सर्वच नियम धाब्यावर बसवून क्षमतेपेक्षा अधिक स्फोटाकांच्या प्रमाणाचा वापर मेसर्स. अदानी इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपनीकडून केला जात आहे.

दररोज विमानतळाच्या सपाटीकरणाच्या कामासाठी दररोज मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या बोर ब्लास्टींगमुळे वहाळ गावातील सर्वच रहिवाशांच्या घरांना मोठ्या प्रमाणावर हादरे बसू लागले आहेत.एखाद्या भुकंपाप्रमाणे मोठ्या प्रमाणावर बसणाऱ्या हादऱ्यांमुळे  ३०० घरांपैकी सुमारे १०० घरांना मोठ्या प्रमाणावर तडे गेल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य घरत यांनी दिली.

वहाळ गावातील रहिवासी केसरीनाथ दापोळकर यांच्या आरसीसी घराच्या कॉलमला मोठ्या प्रमाणावर तडे गेले आहेत.घरातील तीनही भिंतीनाही तडे गेले असल्याने सातत्याने जीवमुठीत धरुनच घरात राहावे लागत आहे.मात्र भीतीमुळे लहान मुलांना दुसऱ्या घरी पाठविण्यात आले असल्याची माहिती केसरीनाथ दापोळकर यांनी दिली. तर आशाबाई दापोळकर या विधवा महिलेच्या घरातील घर,जीना,लाद्या,सिलिंगला ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर तडे गेले आहेत. आर्थिक ओढाताण करून बांधलेल्या एकमेव घरात दोन मुलांसह राहते.

दररोज मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या बोर ब्लास्टींगमुळे वित्त, जिवितहानी होण्याच्या भीतीने घरात नाईलाजाने वास्तव्य करून राहतात असल्याची खंतही आशाबाईंनी व्यक्त केली आहे.बोर ब्लास्टींगच्या जबरदस्त हादऱ्यामुळे संपुर्ण घरच कमकुवत बनल्याने घर राहाण्यास धोकादायक बनले असल्याची व्यथा दामोदर धावजी पाटील यांनी मांडली.

नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सपाटीकरणाच्या कामासाठी सुरू असलेल्या बोर ब्लास्टींगमुळे वहाळ गावातील घरांना हादरे बसत आहेत.अनेक घरांना तडेही गेले आहेत. यामुळे वित्त व जिवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत सिडकोच्या एअरपोर्ट विभाग व पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी करून बोर ब्लास्टींग बंद करण्यात यावे अन्यथा विमानतळाचे कामकाज बंद करण्यासाठी जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती वहाळ ग्रामपंचायतीच्या सरपंच पुजा पाटील यांनी दिली.

बाब गंभीर असल्याने या बोर ब्लास्टींगची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यासाठी तहसीलदारांना सुचना दिल्या असल्याची माहिती प्रांत अधिकारी राहुल मुंडके यांनी दिली.

Web Title: blasting of Navi Mumbai International Airport shook the houses of Wahal village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.