गटातटाच्या राजकारणाला कंटाळून भाजपला साेडचिठ्ठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 00:13 IST2020-11-28T00:12:47+5:302020-11-28T00:13:17+5:30
दयानंद चोरघे : जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना सक्षम करून काॅंग्रेसला प्रबळ करणार

गटातटाच्या राजकारणाला कंटाळून भाजपला साेडचिठ्ठी
शहापूर : भारतीय जनता पक्षात असलेल्या गटातटाच्या राजकारणाला कंटाळून मी पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे. आता राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी, नेते राहुल गांधी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे हात बळकट करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बांधणी करून काँग्रेस पक्ष मजबूत करणार असल्याचे दयानंद चोरघे यांनी वाफे निसर्ग पर्यटन केंद्र येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
शहापूर तालुका काँग्रेस पक्षातर्फे ही पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील, तालुकाध्यक्ष महेश धानके, देवेंद्र भेरे, लक्ष्मण घरत, संध्या पाटेकर, देवेन भेरे, नारायण वेखंडे, गजानन बसवंत, सुरेश पानसरे, गोपाळ घरत, दशरथ तारमले आदी मान्यवर उपस्थित होते. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर चोरगे यांनी ठाणे जिल्ह्यात दौरा करून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. ते म्हणाले की, प्रत्येक स्थानिक कार्यकर्त्याला असे वाटते की, मी एकदा तरी ग्रामपंचायत, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद आदी स्थानिक स्वराज्य संस्थेचा सदस्य, सरपंच, अध्यक्ष तरी होईन. अशा कार्यकर्त्यांना यापुढे मदत करून ठाणे जिल्ह्यात जास्तीतजास्त काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. काँग्रेस मला काय जबाबदारी देणार, याचा विचार न करता मी पुन्हा पक्षप्रवेश केला आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांचा मला नेता व्हायचे आहे.