नवी मुंबई - स्वस्त धान्य दुकानदारांना देण्यात येणाऱ्या धान्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याचा आरोप होत असल्याने यामध्ये सुधारणा करीत धान्यवाटपासाठी बायोमेट्रिक प्रणाली विकसित करण्यात आली आहे; परंतु नवी मुंबई शहरात वारंवार या मशिनचे नेटवर्क गायब होत असल्याने काम बंद पडत असून, नागरिकांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रत्येक वेळी येणाºया या समस्या सोडविण्याची मागणी नागरिक करीत आहेत.स्वस्त धान्य दुकानदार लाभार्थ्यांना धान्य देण्याऐवजी काळ्या बाजारात विक्र ी करीत असून, यामुळे अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थी धान्यापासून वंचित राहत असल्याच्या तक्र ारी दाखल झाल्या होत्या. यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी स्वस्त धान्य दुकानात बायोमेट्रिक पद्धत सुरू करण्यात आली, यामुळे लाभार्थ्यांना धान्य घेताना बायोमेट्रिक मशिनवर अंगठा लावल्यानंतरच धान्य मिळते. स्वस्त धान्य दुकानदारांना मशिन आणि सिमकार्ड शासनाच्या माध्यमातून देण्यात आले आहेत; परंतु नवी मुंबई शहरातील दुकानामध्ये असलेल्या मशिनमधील सिमकार्डचे नेटवर्क गायब होत आहे, त्यामुळे धान्य विक्रीची प्रक्रि या कोलमडत असून धान्य घेण्यासाठी रांगा लावलेल्या लाभार्थ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.या समस्येतून सुटका करण्यासाठी काही दुकानदार खासगी वायफाय इंटरनेटचा वापर करीत आहेत; परंतु ज्या दुकानामध्ये खासगी इंटरनेट सुविधा नाही, त्या ठिकाणी अशा समस्या उद्भवल्यास काम बंद पडत आहे. बायोमेट्रिक पद्धतीने मिळणाºया धान्याच्या समस्या शासनाने सोडविण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
बायोमेट्रिक मशिनचे नेटवर्कच झाले गायब, शिधावाटप दुकानातील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 02:12 IST