निम्म्या शिधापत्रिका झाल्या बायोमेट्रिक

By Admin | Updated: July 30, 2015 00:12 IST2015-07-30T00:12:16+5:302015-07-30T00:12:16+5:30

शिधापत्रिका बायोमेट्रिक करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार राज्याच्या प्रत्येक विभागात शिधापत्रिकांच्या संगणकीकरणाची कार्यवाही सुरू आहे.

Biometric by half rhed card | निम्म्या शिधापत्रिका झाल्या बायोमेट्रिक

निम्म्या शिधापत्रिका झाल्या बायोमेट्रिक

नवी मुंबई : शिधापत्रिका बायोमेट्रिक करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार राज्याच्या प्रत्येक विभागात शिधापत्रिकांच्या संगणकीकरणाची कार्यवाही सुरू आहे. नवी मुंबई विभागात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत जवळपास ५० टक्के शिधापत्रिकाधारकांनी बायोमेट्रिकसाठी अर्ज सादर केले आहेत. पुढील १५ दिवसांत उर्वरित शिधापत्रिकांचेही अर्ज प्राप्त होतील, असा विश्वास शिधावाटप अधिकाऱ्यांनी केला आहे.
नवी मुंबई विभागात घणसोली ते बेलापूर दरम्यान १ लाख ४० हजार ३४५ शिधापत्रिकाधारक आहेत. यात पिवळ्या, केशरी व पांढऱ्या रंगांच्या शिधापत्रिकांचा समावेश आहे. या सर्व शिधापत्रिका बायोमेट्रिक करण्याच्या दृष्टीने शिधावाटप कार्यालयाकडून जोरदार मोहीम सुरू करण्यात आली आहे. महिन्याभरात जवळपास ७६ हजार ५२८ शिधापत्रिकाधारकांनी अर्ज सादर केले आहे. उर्वरितांनी १५ आॅगस्ट २0१५ पर्यंत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन शिधावाटप अधिकारी संजय कोळी यांनी केले आहे.
विभागातील शिधावाटप दुकानांत अर्ज उपलब्ध आहेत. अर्जासोबत शिधापत्रिकेची छायांकित प्रत, शिधापत्रिकेतील सर्व सदस्यांच्या आधार कार्डाची छायांकित प्रत, बँक पासबुकची प्रत व अन्य कागदपत्रे सादर करायची आहेत. (प्रतिनिधी)

लोकप्रतिनिधींना आवाहन
शिधापत्रिकांच्या बायोमेट्रिकचे काम निर्धारित वेळेत पूर्ण व्हावे, या दृष्टीने वाशी शिधावाटप कार्यालयाकडून विविध स्तरांवर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधींनीही सहकार्य करावे, यासाठी त्यांना शिधावाटप कार्यालयांकडून निवेदन देण्यात आले आहे. यात बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे, ऐरोलीचे आमदार संदीप नाईक, महापौर सुधाकर सोनावणे यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवकांचा समावेश आहे. संबंधितांनी शिधापत्रिकेच्या बायोमेट्रिकसंदर्भात आपापल्या क्षेत्रात जनजागृती करावी, अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Web Title: Biometric by half rhed card