भाव घसरला... टोमॅटोच्या दरात मोठी घसरण; शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान
By नामदेव मोरे | Updated: September 11, 2023 19:04 IST2023-09-11T19:03:48+5:302023-09-11T19:04:49+5:30
मुंबईत दहापट दर कमी : शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

भाव घसरला... टोमॅटोच्या दरात मोठी घसरण; शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान
नवी मुंबई : दोन महिने देशभर तेजीत असलेल्या टोमॅटोच्या दरामध्ये राज्यभर प्रचंड घसरण सुरू झाली आहे. मुंबई बाजार समितीमध्ये एक महिन्यात दर दहा पटीने कमी झाले आहेत. होलसेल मार्केटमध्ये ७ ते १० व किरकोळ मार्केटमध्ये २० ते ३० रुपये किलो दराने टाेमॅटोची विक्री होत असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होऊ लागले आहे.
मुंबईमध्ये पुणे व इतर ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात टोमॅटो विक्रीसाठी येत आहे. सोमवारी १९७ टन आवक झाली असून बाजारभाव प्रतिकिलो ७ ते १० रुपयांवर आले आहेत. राज्यातील इतर बाजार समित्यांमध्येही दर कमी झाले आहेत. पुणे ४ ते १०, सोलापूर २ ते ६, कोल्हापूरमध्ये ३ ते १० रुपये दराने विक्री होऊ लागली आहे. पुणे बाजार समितीमध्ये सर्वाधीक २२३ टन आवक झाली आहे. टोमॅटोला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे टोमॅटो रस्त्यावर फेकून दिल्याच्या घटनाही घडू लागल्या आहेत.
राज्यातील टोमॅटोचे प्रतीकिलो बाजारभाव पुढीलप्रमाणे
बाजार समिती - बाजारभाव
कोल्हापूर - ३ ते १०
औरंगाबाद - ३ ते ९
श्रीरामपूर - १५ ते २०
पुणे - ४ ते १०
नागपूर ७ ते १०
रत्नागिरी ५ ते ८
सोलापूर २ ते ६
मुंबईमधील महिनानिहाय बाजारभाव
महिना - बाजारभाव
जुन - १५ ते २२
जुलै - ७० ते १००
ऑगस्ट ७० ते ८०
सप्टेंबर - ७ ते १०