Big challenge to remove peddlers, Navi Mumbai Municipal Corporation is helpless with the police | फेरीवाले हटविण्याचे मोठे आव्हान, पोलिसांसह नवी मुंबई महापालिका हतबल

फेरीवाले हटविण्याचे मोठे आव्हान, पोलिसांसह नवी मुंबई महापालिका हतबल

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळ मार्केटसमोरील रोडवर १०० पेक्षा जास्त फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. मुख्य रोडवरील अतिक्रमण हटविण्यास महानगरपालिकेसह पोलिसांना अपयश आले आहे. या फेरीवाल्यांमुळे परिसरात कचऱ्याचे  ढीग तयार होत असून, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता  निर्माण झाली आहे. फळ मार्केटमधील व्यापाऱ्यांनी मनपा आयुक्तांना पत्र पाठवून हा रोड फेरीवालामुक्त बनविण्याची मागणी केली आहे.

आशिया खंडातील सर्वांत मोठी सहकारी बाजारपेठ म्हणून मुंबई बाजार समितीची  ओळख आहे. परंतु बाजार समितीच्या बाहेरील परिस्थिती पाहून स्थानिक मार्केटपेक्षा वाईट परिस्थिती बाजार समितीची झाली आहे. अन्नपूर्णा चौक ते माथाडी भवनपर्यंतच्या मुख्य रोडवर दोन वर्षांपासून फेरीवाल्यांनी अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. भाजी व फळ मार्केटमध्ये रोजंदारीवर काम करणारे कामगार, पाला गोळा करणाऱ्या महिला, भिकारी व इतर अनेक जण कचऱ्यात टाकून दिलेली फळे, भाजीपाला गोळा करतात व मार्केटबाहेर रोडवर आणून विकत असतात. स्वस्त दरात भाजीपाला मिळत असल्यामुळे नागरिकही या ठिकाणावरून खरेदी करतात.

महानगरपालिका प्रशासनाने सुरुवातीला या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केले. मनपा प्रशासनाचाच याला पाठिंबा असल्याचेही सुरुवातीला बोलले जात होते. सद्य:स्थितीमध्ये या फेरीवाल्यांना हटविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. पहाटेपासून सायंकाळपर्यंत रोडवर फेरीवाले ठाण मांडून बसत आहेत. मार्केटबाहेर फेरीवाल्यांचा व्यवसाय करणाऱ्यांमुळे अनेकांना कोरोनाची लागणही झाली आहे. दि फ्रूट अँड व्हेजिटेबल मर्चंट्स असोसिएशननेही याविषयी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांना पत्र पाठविले आहे. रोडवरील अनधिकृत विक्रेत्यांमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका असल्याचे स्पष्ट केले आहे. तत्काळ व ठोस कारवाई करण्याची मागणीही केली आहे. परंतु तक्रार करून दहा दिवस झाल्यानंतरही अद्याप काहीच कारवाई केलेली नाही. महानगरपालिका प्रशासन कारवाई केल्याचा दिखावा करते परंतु कारवाई झाली की काही वेळाने पुन्हा विक्रेते तेथे व्यवसाय करू लागतात. यामुळे प्रशासनाने हा प्रश्न कायमस्वरूपी मिटविण्यासाठी ठोस कारवाई करावी. अतिक्रमण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही करण्यात येत आहे.

फळ मार्केटच्या समोर मुख्य रोडवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. भाजी व फळ मार्केटमध्ये फेकून दिलेला कृषीमाल या ठिकाणी विकला जात असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचीही शक्यता असून महानगरपालिकेने ठोस कारवाई करण्याची गरज आहे. - महेश मुंढे, सहसचिव,  दि फ्रूट अँड व्हेजिटेबल मर्चंट्स असोसिएशन  

पोलीस स्टेशनजवळच अतिक्रमण
फळ मार्केटसमोर वाहतूक पोलीस चौकीसमोरच फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. यापासून जवळच एपीएमसी पोलीस स्टेशन व पोलीस उपआयुक्तांसह सहआयुक्तांचे कार्यालय आहे. पोलीस स्टेशनच्या रोडवरच फेरीवाल्यांचे अतिक्रमण पाहून नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पालिकेच्या विभाग कार्यालयापासून १ किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर हा प्रकार सुरू असूनही ठोस कारवाई
होत नाही. 

Web Title: Big challenge to remove peddlers, Navi Mumbai Municipal Corporation is helpless with the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.