निवडणुकीच्या रणधुमाळीत भूमाफिया सुसाट; बांधकामे तेजीत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 11:51 PM2019-10-15T23:51:23+5:302019-10-15T23:51:50+5:30

नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न गंभीर बनला आहे.

Bhumafia swoops in election rigging; Works fast | निवडणुकीच्या रणधुमाळीत भूमाफिया सुसाट; बांधकामे तेजीत

निवडणुकीच्या रणधुमाळीत भूमाफिया सुसाट; बांधकामे तेजीत

Next

नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी भूमाफियांच्या चांगलीच पथ्यावर पडली आहे. याचा परिणाम म्हणून मागील महिनाभरापासून शहरात बेकायदा बांधकामांनी पुन्हा उचल खाल्ली आहे. विशेषत: गावगावठाणात अर्धवट अवस्थेत बंद पडलेली बांधकामे पुन्हा तेजीत सुरू झाली आहे. तर बहुतांशी गावांच्या खाडीकिनाऱ्यावर खारफुटीवर भराव टाकून झोपड्या उभारण्याचा सपाटा सुरू असल्याचे दिसून येते.


नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न गंभीर बनला आहे. विशेषत: प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या फिफ्टी फिफ्टी बांधकामांचा गहन प्रश्न निर्माण झाला आहे. २०१५ पर्यंतची ही बांधकामे नियमित करण्याचे राज्य सरकारने यापूर्वीच जाहीर केले आहे; परंतु त्याबाबत ठोस धोरण तयार होत नसल्याने प्रकल्पग्रस्तांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, त्यानंतर सिडको व महापालिकेने केलेल्या आवाहनानंतर अनेक प्रकल्पग्रस्तांनी आपली सुरू असलेली बांधकामे बंद केली. फिफ्टी फिफ्टीच्या बांधकामांना आळा बसला. मात्र, चार वर्षांत बांधकामे नियमित होण्याच्या दृष्टीने कोणतीच कार्यवाही न झाल्याने अनधिकृत बांधकामे पुन्हा उभारली जाऊ लागली आहेत.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर या बांधकामांनी वेग घेतल्याचे दिसून येते. महापालिका आणि सिडकोच्या संबंधित विभागातील बहुतांशी अधिकारी व कर्मचारी निवडणूक ड्युटीवर आहेत. तसेच पोलीस यंत्रणासुद्धा निवडणुकीच्या कामात व्यस्त आहे. त्यामुळे नियमित कारवाईकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. याचा फायदा भूमाफियांनी घेतल्याचे दिसून येते. याचा परिणाम म्हणून याअगोदर कारवाई करून जमीनदोस्त झालेली बांधकामे पुन्हा उभारू लागली आहेत. तसेच मागील महिनाभरात अर्धवट अवस्थेतील बांधकामे पूर्ण झाली आहेत. घणसोली, गोठीवली, रबाळे, ऐरोलीसह कोपरी, सानपाडा आदी विभागात पुन्हा बेकायदा बांधकामे जोमात सुरू असल्याचे दिसून आले आहे. त्याचप्रमाणे एमआयडीसी क्षेत्रातही अनधिकृत झोपड्या उभारण्याचे प्रमाण वाढले आहे. बेकायदा गोदामे बांधून ते भाडेतत्त्वावर देण्याचा सपाटा सुरू आहे. विशेष म्हणजे, विधानसभेच्या ऐरोली मतदारसंघासह बेलापूर मतदारसंघातील गावगावठाणे, बैठ्या वसाहती आदी ठिकाणी बेकायदा बांधकामांचा धडाका सुरू असल्याचे दिसून येते.
 

‘नैना’ क्षेत्रातही बांधकामांचा धडाका
आचारसंहिता लागू होताच सिडकोच्या ‘नैना’ क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे सुरू झाली आहेत. ‘नैना’च्या पहिल्या टप्प्याच्या विकासाचे नियोजन सिडकोने हाती घेतले आहे. दुसºया टप्प्याचा विकास आराखडाही मंजूर झाला आहे. त्यामुळे या विभागात अनधिकृत बांधकामे उभारणार नाहीत, याची दक्षता संबंधित विभागाकडून घेतली जात आहे. मात्र, निवडणुकीची धामधूम भूमाफियांच्या पथ्यावर पडल्याने या क्षेत्रात आजमितीस मोठ्या प्रमाणात विनापरवाना बांधकामे सुरू असल्याचे पाहावयास मिळते.

Web Title: Bhumafia swoops in election rigging; Works fast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.