राफेलप्रकरणी भाजपाचे पाय खोलात - भाई जगताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 04:20 IST2018-12-27T04:19:53+5:302018-12-27T04:20:11+5:30
राफेलप्रकरणी खोटे अॅफिडेव्हिट सादर करणाऱ्या भाजपाने गल्लीबोळात पत्रकार परिषद घेण्यापेक्षा एका व्यासपीठावर येवून काँग्रेसच्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत, असे आव्हान काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी पनवेल येथे केले.

राफेलप्रकरणी भाजपाचे पाय खोलात - भाई जगताप
पनवेल : राफेलप्रकरणी खोटे अॅफिडेव्हिट सादर करणाऱ्या भाजपाने गल्लीबोळात पत्रकार परिषद घेण्यापेक्षा एका व्यासपीठावर येवून काँग्रेसच्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत, असे आव्हान काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी पनवेल येथे केले. भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी राफेल घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसचे आरोप खोडून काढण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यांच्या पत्रकार परिषदेला उत्तर देण्यासाठी शहरात बुधवारी जगताप यांची पत्रकार परिषद आयोजित केली होती.
राफेल विमानाच्या खरेदीची किंमत सुप्रीम कोर्टाला दिली असताना सुरक्षेचे खोटे कारण सांगून भाजपा राफेल भ्रष्टाचार लपविण्याचा प्रयत्न करीत आहे. सुप्रीम कोर्टात खोटे अॅफिडेव्हिट सादर करणाºया भाजपाला गल्लीबोळात जावून पत्रकार परिषद घेवून स्पष्टीकरण द्यावे लागत आहे. इथेच भाजपाचे अपयश उघड होत आहे. राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी, अशी माधव भंडारी यांनी केलेल्या मागणीची खिल्ली उडवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या लोकशाहीला बाधक कृत्य केले आहे. त्यांनी भारताच्या १२५ कोटी जनतेची माफी मागावी, अशी मागणी जगताप यांनी केली.
खोटे बोल रेटून बोलणाºया पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांची नार्को टेस्ट केल्यास सत्य बाहेर येईल, असेही ते म्हणाले. राफेल प्रकरणी आमच्या फक्त पाच प्रश्नांची उत्तरे देण्याचे आवाहन त्यांनी भाजपा सरकारला केले आहे.