तलावातील गाळ काढण्यास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 01:10 IST2020-02-29T01:10:22+5:302020-02-29T01:10:28+5:30
साठवण क्षमतेत वाढ

तलावातील गाळ काढण्यास सुरुवात
नवी मुंबई : महापालिका कार्यक्षेत्रामधील तलावांमध्ये गाळ साठल्यामुळे साठवण क्षमता कमी होऊ लागली आहे, यामुळे तलावांमधील गाळ काढण्याची मागणी होऊ लागली आहे. या मागणीची दखल घेऊन महापालिकेने तुर्भे व इतर तलावांमधील गाळ काढण्यास सुरुवात केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये एकूण २४ तलाव असून, दोन लाख २३ हजार ६६१ चौरस मीटर क्षेत्रफळ जमीन तलावांनी व्यापली आहे. महानगरपालिकेने यापूर्वी तलाव व्हिजन राबवून परिसराचे सुशोभीकरण केले आहे. मोठ्या तलावांमध्ये भिंत टाकून गणेश विसर्जनासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध केली आहे. वर्षानुवर्षे गणेशविसर्जन केल्यामुळे अनेक ठिकाणी तलावांमध्ये गाळ साचला आहे. गाळामुळे तलावांची साठवण क्षमता कमी झाली आहे. यामुळे तलावांमधील गाळ काढण्याची मागणी नगरसेवक व नागरिकांकडून होऊ लागली आहे.
तुर्भे गावामध्ये ८४४२ चौरस मीटर लांबीचा तलाव आहे. या तलावामध्येही गाळ साचला होता. महापालिका प्रशासनाने गाळ काढण्याचे काम सुरू केले आहे. गाळ काढल्यामुळे तलावाची खोली वाढणार असून, पाण्याची साठवणक्षमताही वाढणार आहे. याशिवाय तलाव प्रदूषणमुक्त होणार आहे. तुर्भेप्रमाणे इतर तलावांमधील गाळ काढावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.