पाणीबाणीत ‘देहरंग’चा आधार

By Admin | Updated: April 18, 2016 00:49 IST2016-04-18T00:49:00+5:302016-04-18T00:49:00+5:30

धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने नवी मुंबई, पनवेल शहरात पाणीकपात करण्यात आली आहे. पनवेल नगरपालिकेकडून शहरात दोन झोन पाडून दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात

The basis of 'Dehang' in water drain | पाणीबाणीत ‘देहरंग’चा आधार

पाणीबाणीत ‘देहरंग’चा आधार

- प्रशांत शेडगे,  पनवेल
धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने नवी मुंबई, पनवेल शहरात पाणीकपात करण्यात आली आहे. पनवेल नगरपालिकेकडून शहरात दोन झोन पाडून दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. एमजेपी आणि एमआयडीसीकडून आलेले पाणी शहरात वितरीत करण्यात येत असल्याने देहरंग धरणातील पाणीसाठ्याचा फारसा उपसा झालेला नाही. परिणामी, आजघडीला धरणात ३५० एमएलडीपेक्षा जास्त पाणी शिल्लक असून ७ जूनपर्यंत पाणी पुरेल, असे नियोजन पालिका प्रशासनाने केले आहे. त्यामुळे पाणीबाणीच्या काळातही पाण्याकरिता पनवेलकरांना फारशी वणवण करावी लागणार नाही.
पनवेल पालिकेने शहराला पाणीपुरवठा करण्याकरिता १०० वर्षांपूर्वी धरण विकसित केले आहे. एकूण १५ किमी अंतरावर असलेल्या या धरणातून जलवाहिनीव्दारे शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. या जलाशयात एकूण ३.५७ दशलक्ष घनमीटर पाणी साठवून ठेवण्याची क्षमता होती. धरणात गाळ साठल्याने खोली कमी होत आहे.
देहरंग धरणातून केवळ २ ते ३ एमएलडी पाणी गेल्या दोन महिन्यांपासून घेण्यात येत आहे. शटडाऊनवगळता इतर वेळी जास्त पाणी घेण्यात आले नाही. त्यामुळे देहरंग धरणात पुरेसा पाणीसाठा शिल्लक असून मे महिना व शटडाऊनच्या काळात हे पाणी शहरवासीयांना वितरीत करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अपव्यय टाळण्याकरिता उपाययोजना
वितरणातील दुरुस्ती, पाइपलाइनची दुरुस्ती करणे, हौदावर तीन मोटार पर्याय म्हणून ठेवणे,गळती थांबवणे, प्रक्रि या झालेल्या पाण्याचा पुनर्वापर करणे, तीन ठिकाणी कूपनलिका खोदून टंचाईग्रस्त भागाला पाणी देणे, सोसायट्यांतील ओव्हरफ्लो थांबविणे यासारख्या उपाययोजना पालिका प्रशासनाने सुरू केल्या आहेत. त्याचा परिणाम शहरात जाणवत असून जनजागृती सुध्दा मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे.

एमजेपी आणि एमआयडीसीकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर पनवेलकरांची तहान भागविण्याचा निर्णय पालिकेने घेतला. त्यानुसार नगराध्यक्षा चारुशीला घरत, पाणीपुरवठा सभापती अनिल भगत, मुख्याधिकारी मंगेश चितळे यांनी नियोजन केले.

एमजेपीकडून फेब्रुवारी, मार्च महिन्यातच पाणीकपात करण्यास सुरुवात झाली. त्यामुळे पनवेल नगरपालिकेनेही पाणीकपात सुरू केली.

देहरंग धरणाचा घसा मार्च एंडलाच दरवर्षी कोरडा पडतो. परंतु यावर्षी अद्यापही धरणात बऱ्यापैकी पाणीसाठा आहे ही बाब दिलासादायी आहे. आम्ही दिवसाआड पाणीपुरवठा करून पाण्याचे योग्य नियोजन केले आहे. धरणातील पाणी कमी वापरत असून ते मे महिना किंवा शटडाऊनच्या काळात वापरता येणे शक्य होईल.
- मंगेश चितळे,
मुख्याधिकारी, पनवेल

Web Title: The basis of 'Dehang' in water drain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.