जेएनपीटीच्या हद्दीवर हात मारणाऱ्यांना अटक; न्हावाशेवा पोलिसांची कारवाई, घरफोडीचे सात गुन्हे उघड
By सूर्यकांत वाघमारे | Updated: December 11, 2023 19:27 IST2023-12-11T19:27:33+5:302023-12-11T19:27:59+5:30
न्हावाशेवा परिसरात घडणाऱ्या घरफोडीच्या गुन्ह्यांच्या अनुशंघाने पोलिस तपास करत होते.

जेएनपीटीच्या हद्दीवर हात मारणाऱ्यांना अटक; न्हावाशेवा पोलिसांची कारवाई, घरफोडीचे सात गुन्हे उघड
नवी मुंबई : घरफोडी प्रकरणी न्हावाशेवा पोलिसांनी दोघांना अटक केली असता, त्यांनी जेएनपीटीच्या वापर नसल्याने साठवलेल्या "रद्दी" कागदपत्रांवर देखील हात मारल्याचे समोर आले आहे. अटक केलेले दोघेही उत्तर प्रदेशचे असून त्यांच्याकडून घरफोडीचे सात गुन्हे उघड झाले आहेत.
न्हावाशेवा परिसरात घडणाऱ्या घरफोडीच्या गुन्ह्यांच्या अनुशंघाने पोलिस तपास करत होते. उपायुक्त पंकज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक संजीव धुमाळ यांनी निरीक्षक दीपक इंगोले, सहायक निरीक्षक अमोल शिंदे, संजय मोहिते, उपनिरीक्षक नितीन सांगळे आदींचे पथक केले होते. या पथकाने कौशल्यपुरतं तपास करून दोघांना अटक केली आहे. मैनुद्दीन इलियास खान (३५) व छोटू केवट (३९) अशी त्यांची नावे असून दोघेही मूळचे उत्तर प्रदेशचे राहणारे आहेत. त्यांच्या अधिक चौकशीत त्यांनी केलेले सात गुन्हे उघड झाले आहेत. त्यामधील चोरीच्या तारा, बॅटरी, टीव्ही यासह गुन्ह्यात वापरलेले वाहन असा साडेतीन लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. अधिक चौकशीत त्यांनी फेब्रुवारी मध्ये जेएनपीटीच्या गोडाऊन म्हणून वापरल्या जाणाऱ्या घरांमद्ये देखील घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याठिकाणी जेएनपीटी प्रशासनाची वापरात नसलेला दस्तऐवज ठेवण्यात आला होता. त्यांनी सदर ठिकाणी घरफोडी केली असता केवळ हि रद्दी हाती लागल्याने त्यांनी ती देखील चोरून नेली होती.